सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !

सरकारकडून ३ लेखी आश्वासने मिळाल्यानंतर निर्णय !

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक

नवी देहली – सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आंदोलनाच्या २६ व्या दिवशी २३ जुलैच्या मध्यरात्री १२.३० वाजता अंतत: उपोषण संपवले. वांगचुक यांनी माहिती दिली की, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह, तसेच लडाखचे वरिष्ठ नेते मला भेटायला आले होते. गेल्या २ दिवसांपासून माझ्यात आणि सरकारमध्ये चर्चा चालू होती. मी सरकारकडे लेखी आश्वासनांची मागणी केली होती. सरकारने माझ्या मागण्यांविषयी लेखी आश्वासने दिली. यामुळे मी उपोषण संपवण्याचा निर्णय घेतला.

सरकारने दिलेल्या ३ प्रमुख लेखी अटी !

सोनम वांगचुक म्हणाले की, सरकारने खालील मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या आहेत :

१. जंतरमंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणार्‍या किंवा २० जुलै या दिवशी ‘संसद मोर्चा’मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि तरुण यांच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही किंवा गुन्हा नोंदवला जाणार नाही. (जर ते विद्यार्थी नसले आणि त्यांनी हिंसाचार केला असेल, तर त्यांच्यावर कारवाई का होऊ नये ? राज्यघटनेचा संदर्भ देणार्‍या वांगचुक हेच अशा प्रकारची मागणी करून राज्यघटनेची पायमल्ली करत आहेत ! – संपादक)

२. प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनेमुळे प्राण गमावलेल्या २० हून अधिक विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना सरकार योग्य हानीभरपाई देईल.

३. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी या संपूर्ण सूत्रावर, परीक्षा प्रणालीतील सुधारणांवर आणि शिक्षण क्षेत्रातील सरकारच्या उत्तरदायित्वावर संसदेत सविस्तर चर्चा केली जाईल.