India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !

भारताने चीनला सुनावले !

नवी देहली – भारताने नेहमीच चीनच्या सार्वभौमत्वाचा आदर केला आहे; परंतु सीमेवरील चीनच्या कृत्यांविषयी असे म्हणता येणार नाही. जेव्हा सार्वभौमत्वाच्या सूत्रांचा  विषय येतो, तेव्हा प्रत्यक्षात भारतच ही सूत्रे मांडत आला आहे. भारत कोणत्याही प्रकारे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत नाही. या सूत्राविषयी आमची भूमिका नेहमीच एकसारखी राहिली आहे. चीनने वर्ष १९६३ पासून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांच्या काही भागांवर अवैधपणे नियंत्रण मिळवले आहे. या भागांवर भारताचा अधिकार स्वतः चीनही अधिकृतपणे मान्य करतो. जम्मू-काश्मीरमधील भारताच्या मालकीच्या भागात चीनचे प्रकल्पही चालू असून आम्ही त्यास विरोध करतो, अशा शब्दांत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला सुनावले. भारताने चीनच्या भागांवर नियंत्रण मिळवल्याचा आणि सार्वभौमत्वचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरून भारताने वरील प्रत्युत्तर दिले.

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वाँग यी यांच्यातील बैठकीचा अधिकृत तपशील चीनने प्रसिद्ध केल्यानंतर हे विधान आले आहे. यामध्ये जयशंकर यांनी असे म्हटल्याचा दावा केला होता की, तैवान आणि तिबेट यांच्याविषयी भारताची भूमिका पूर्वीसारखीच असून भारत चीनच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो.

संपादकीय भूमिका

नुसते सुनावून काय उपयोग ? चीनला ते भाग रिकामी करून परत भारताच्या कह्यात देण्याची मागणी का केली जात नाही ? चीन ही मागणी मान्य करणार नाही, हे स्पष्ट आहे, तर भारत चीनशी दोन हात करून ती परत घेण्याची धमक दाखवणार आहे का ? हे मूळ प्रश्न आहेत !