नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची चिथावणी देणार्‍या गौहर चिश्तीला अटक !

भाग्यनगर येथे केली कारवाई !

भाग्यनगर (तेलंगाणा) – अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यातील खादिम (सेवेकरी) गौहर चिश्ती याला भाग्यनगर येथून अटक करण्यात आली. नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित रूपाने केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून चिश्ती याने गेल्या मासात शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची चिथावणी मुसलमानांना दिली होती. तसेच उदयपूर येथील कन्हैयालाल यांची हत्या करणार्‍यांशी त्याचा संबंध असल्याचे समोर आले आहे. कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर दोघे जिहादी चिश्ती याला भेटायला जात असतांना पोलिसांनी त्यांना अटक केली होती. चिश्तीला अजमेरला नेले जाणार आहे.

चिश्तीने दिलेली चिथावणीचे प्रकरण समोर आल्यावर परिवारासमवेत चिश्ती फरार होता. चिश्ती १७ जून या दिवशी राजस्थानच्या उदयपूरला गेला होता. तेथे त्याने ‘सर तन से जुदा’च्या (धडापासून शिर वेगळे करा) घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी त्याने कन्हैयालाल यांच्या हत्यार्‍यांपैकी महंमद रियाज याची भेट घेतली होती. त्याच दिवशी रियाज याने एक व्हिडिओ बनवून शिरच्छेदावर भाष्य केले होते.

काय बोलला होता गौहर चिश्ती ?

गौहर चिश्तीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता, ज्यात तो म्हणाला होता, ‘पैगंबर यांच्या विरोधात केलेले वक्तव्य कदापि सहन केले जाणार नाही. ‘गुस्ताख ए रसूल की एक सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा ।’ (पैगंबर यांचा अपमान करणार्‍याचा ‘शिरच्छेद’ ही एकच शिक्षा आहे.) पैगंबर यांचा अनादर टाळण्यासाठी आम्ही शिरच्छेद करण्यासही सिद्ध आहोत. नूपुर शर्मा यांनी चूक केली असून त्यांना जिवंत रहाण्याचा अधिकार नाही !’ अजमेर पोलिसांनी २५ जून या दिवशीच गौहर चिश्तीच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता.