मुसलमान पक्षाकडून हिंदूंचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना खटल्यातून हटवण्याची मागणी

ज्ञानवापी प्रकरणी हिंदु पक्षाकडून जिल्हा न्यायालयात युक्तीवाद

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीच्या प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी चालू झाली आहे. हिंदु पक्षाकडून युक्तीवाद करण्यात येत आहे. यापूर्वी मुसलमान पक्षाकडून युक्तीवाद पूर्ण करण्यात आला आहे. तत्पूर्वी मुसलमान पक्षाकडून नवीन याचिका प्रविष्ट करून या प्रकरणातील एक अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना या खटल्यातून हटवण्याची मागणी केली आहे. मुसलमानांचे म्हणणे आहे की, अधिवक्ता जैन या प्रकरणात वादी आणि प्रतिवादी या दोन्ही पक्षांकडून खटला लढवत आहेत.

याविषयी अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले की, तांत्रिक स्तरावर ही याचिका फेटाळली जाणार आहे; कारण या प्रकरणात मी सर्वाेच्च न्यायालयात उत्तरप्रदेश सरकारचे प्रतिनिधित्व करत आहे; मात्र या न्यायालयात हिंदु पक्षाकडून युक्तीवाद करत आहे. सरकारकडून मी वकीलपत्र प्रविष्ट केलेले नाही. या प्रकरणात उत्तरप्रदेश सरकार केवळ एक औपचारिक पक्ष आहे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीचे प्रकरणही असेच होते. माझ्या विरोधात षड्यंत्र रचून आरोप केले जात आहेत. हे मोठे षड्यंत्र आहे. यातून मूळ सूत्राला भरकटवण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र न्यायालयात हे चालणार नाही.