घरात एक जरी उंदीर शिरला, तर सर्वांचीच डोकेदुखी होते. उंदीर अन्नधान्य खाण्यासह कपडे आणि अन्य गोष्टी कुरतडून टाकतात, तसेच घरातील अनेक गोष्टींची नासधूस करतात. उंदरांना घालवण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही ते जात नाहीत. अशा परिस्थितीत ही हानी टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करून उंदरांपासून सुटका होऊ शकते.
काही घरगुती उपाय
१. पेपरमिंट : पेपरमिंटच्या वासाने उंदीर पळून जातात. उंदरांना दूर ठेवण्यासाठी घराच्या प्रत्येक कोपर्यात पेपरमिंट घालून कापसाचा बोळा ठेवल्यास उंदीर लगेच घर सोडून पळून जातील. त्यामुळे उंदीर घालवण्यासाठी पेपरमिंट पुष्कळ लाभदायी ठरू शकते.
२. तंबाखू : तंबाखूही उंदीर दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. यासाठी एका भांड्यात चिमूटभर तंबाखू घेऊन त्यात २ चमचे देशी तूप आणि बेसन घालून गोळ्या बनवा. या गोळ्या घराच्या ज्या कोपर्यात वारंवार उंदरांचा वावर असतो, त्या ठिकाणी ठेवा. उंदीर त्यांना खातातच आणि ते बेशुद्ध अवस्थेत घर सोडून बाहेर पडतात.
३. पुदिना : उंदरांना पुदिन्याचा वास आवडत नाही. उंदरांना घरापासून दूर ठेवण्यासाठी पुदिन्याची पाने घराच्या कानाकोपर्यात ठेवल्यास घरात त्यांचा प्रवेश टाळता येईल. पुदिन्याचा वास पुष्कळ उग्र असतो. ज्याचा वास उंदरांना सहन न झाल्याने उंदीर नाहीसे होतात.
४. तमालपत्र : घरातील उंदीर हाकलण्यासाठी तमालपत्र वापरणे, हा एक चांगला उपाय आहे. यासाठी घरात ज्या ठिकाणी उंदरांचा वावर अधिक आहे, तेथे तमालपत्र ठेवा. याच्या सुगंधाने उंदीर घरातून पळून जातील.
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’)