प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनपंक्तींतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे घडलेले जीवनदर्शन !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांनी लिहिलेली भजने, म्हणजे साधकांच्या जीवनातील ‘नाद संजीवनी’ आहे. सहस्रो साधकांनी प.पू. बाबांच्या चैतन्यमय भजनांची अनुभूती घेतली आहे. त्या चैतन्यमय भजनांमधील काही पंक्तींच्या आधारे आपले गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवन पाहू. त्यातून गुरुदेवांचा महिमा जाणून घेऊ.

१. गुरुदेवांनी दिलेली सर्वांत अमूल्य गोष्ट म्हणजे ‘गुरुकृपायोग’ !

१ अ. प.पू. भक्तराज महाराज यांचे एक भजन ‘अमोल चीज जो दी गुरूने ।’

प.पू. भक्तराज महाराज यांनी (प.पू. बाबांनी) त्यांच्या ‘अमोल चीज जो दी गुरूने ।’ या भजनात म्हटले आहे, ‘अमोल चीज जो दी गुरूने, न दे सके भगवान भी । धन जो दिया अमोल मुझको, खाया खुटे वो न भी । (अर्थ : भगवंत देऊ शकत नाही, अशी अनमोल चीज (गोष्ट) श्री गुरूंनी दिली आहे, ते म्हणजे देवाचे नाम ! नामधन इतके दिले आहे की, ते कितीही घेतले (खाल्ले), तरी ते न्यून होत नाही.)

१ आ. अथांग संसारसागरात भरकटलेल्या जिज्ञासूंच्या जीवननौकेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गामुळे योग्य मार्ग मिळणे : भगवंताने कुणालाही दिली नाही, अशी एक अमूल्य गोष्ट परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्याला दिली आहे आणि ती म्हणजे ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग !’ साधना न करणार्‍या जिवांची स्थिती अथांग समुद्रात वाट चुकलेल्या आणि त्याच वेळी वादळात सापडलेल्या नावेसारखी आहे. आपल्याला देवाची आवड होती; पण ‘योग्य साधना कोणती ?’, हे ठाऊक नव्हते. एकीकडे किनारा नसलेला अथांग समुद्र, तर दुसरीकडे वादळ ! गुरुदेवांनी अशा स्थितीत असलेल्या आपल्यासारख्या जिवांना साधनेचा योग्य मार्ग दाखवला. त्यात ऐन कलियुगातील संधीकाळ आणि आपत्कालीन स्थिती निर्माण झाली. तेव्हा गुरुदेवांनी ‘सर्वांची जीवननौका सुरक्षित रहाण्यासाठी कोणती काळजी घ्यायची ?’, तेही सांगितले. ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे दीपस्तंभ आणि साधकांचे आपत्काळातील ईश्वर असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी न्यूनच आहे.

२. प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘ज्ञानचक्षु तुझे ।’ या भजनातील एक वाक्य ‘अनंताचा अंत । कोणी शोधिलासे ।’

प.पू. बाबा त्यांच्या भजनात म्हणतात, ‘अनंताचा अंत कोणी शोधिलासे ।’ अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. अनंत अध्यात्मशास्त्र समजून घेणे शक्य नाही; मात्र गुरुदेवांनी आम्हा साधकांना अल्प कालावधीत त्या अनंत अध्यात्माचे अनेक पैलू शिकवले आहेत.

२ अ. अल्प कालावधीत अनंत असलेल्या अध्यात्मशास्त्रातील विविध पैलू साधकांना शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! : ‘गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु म्हणजे कोण ? समाजातील संत-महंत, मठाधिपती, आचार्य, उपासक, महाराज म्हणजे कोण ?, त्यांना कसे ओळखायचे ?, स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा म्हणजे काय ? स्थुलापेक्षा सूक्ष्म महत्त्वाचे असून, स्थूल जगतापेक्षा सूक्ष्मातील जग फार मोठे आहे’, हे सगळे गुरुदेवांनी साधकांना शिकवले. गुरुदेवांनी सनातनच्या प्रत्येक साधकामध्ये ‘ईश्वरच सर्व करतो’, हे लीलया बिंबवले. त्यामुळे साधक ‘ईश्वरच सर्व करत आहे’, अशी अनुभूती दिवसरात्र घेऊ शकत आहेत. अशा अनेक गोष्टी शिकवूनही गुरुदेव म्हणतात, ‘हे सर्व ईश्वरानेच करवून घेतले.’ सनातनच्या साधकांचे भाग्य थोर असल्यामुळेच त्यांना अशा श्रीगुरूंची छत्रछाया मिळाली !

३. प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन ‘बाप माझा हो ज्ञानवंत ।’

श्री. विनायक शानभाग

प.पू. बाबांनी त्यांच्या ‘बाप माझा हो ज्ञानवंत ।’ या भजनात त्यांच्या श्री गुरूंचे वर्णन करतांना लिहिले आहे –

उभा असे मायाबाजारी । न ओळखे कोणी । धक्के खायी जनी ।
शांत श्री मनी । नरवेश नटे त्रिपुरारी । असा जो मायावंत ।।

३ अ. अतिशय प्रज्ञावंत आणि ईश्वरस्वरूप असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वागणे-बोलणे सामान्य साधकांप्रमाणेच असल्यामुळे साधकांना ते त्यांच्यासारखेच वाटणे : अध्यात्माचे अभ्यासवर्ग घेतांना, वसंत व्याख्यानमालेत व्याख्यान देतांना, प.पू. बाबांची सेवा करतांना किंवा प.पू. शामराव महाराज यांच्याकडे जाऊन संशोधन करतांना, साधा पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि पँट घातलेले सर्वसामान्य साधकाप्रमाणे वागतांना अन् बोलतांना अनेक साधकांनी गुरुदेवांना अगदी जवळून पाहिले आहे. आता साधकांना वाटते, ‘अरे, भगवंत या रूपात आला होता आणि आम्हाला तो आमच्यासारखाच वाटला.’ त्यामुळे ‘असा जो मायावंत । बाप माझा हो ज्ञानवंत’ या ओळी गुरुदेवांना १०० टक्के लागू होतात.

४. कृतज्ञता

गुरुदेवांचा महिमा शब्दांत मांडणे शक्य नाही. वरील ओळी म्हणजे ‘समुद्रातील काही थेंब’ एवढेच आहे. सनातनच्या सहस्रो साधकांनी गेल्या अनेक वर्षांत गुरुदेवांविषयी जे अनुभवले आहे, ज्या अनुभूती घेतल्या आहेत, त्या गुरुऋणाचा आम्ही विचारही करू शकत नाही. वेद किंवा पुराणे वाचून जे मिळत नाही, प्रतिदिन कर्मकांड किंवा ध्यानधारणा करून जे साध्य होत नाही, कोटी कोटी वेळा दान करूनही जे फळ प्राप्त होत नाही, ते म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले’ !; मात्र गुरुदेवा, सनातनच्या साधकांना काही विशेष प्रयत्न न करता तुम्ही सहज लाभला आहात. किंबहुना तुम्ही सनातनच्या साधकांसाठीच पृथ्वीवर आणि सनातनच्या साधकांच्या जीवनात आला आहात. यासाठी आम्ही सनातनचे सर्व साधक दोन्ही कर जोडून आणि तुमच्या चरणी माथा नमवून कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), चेन्नई, तमिळनाडू. (४.७.२०२२)


प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन ‘कसा हा असला खेळ ।’

प.पू. बाबांचे एक भजन आहे, ‘कसा हा असला खेळ।’, त्यामध्ये एक कडवे आहे –

नीर नदीचे झुळ झुळ वाही । धाव सागराकडे ते घेई ।
सरिता आपणा विसरूनी जाई । सागर चरणी लीन ती होई ।
प्रेम भरतीचा मेळ । नाथा ।।

सर्वसामान्य जिवांना साधनेत आणून त्यांच्याकडून साधना करवून घेऊन काही वर्षांतच त्यांना जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त करून संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु या पदांपर्यंत नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! : ‘नदीचे पाणी वहात वहात सागरापर्यंत पोचून ते सागरात कधी विलीन झाले ?’, ते साधकांना कळलेच नाही. गुरुदेवांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य पामर जिवांचे साधकात रूपांतर केले, काही साधक संत, काही सद्गुरु, तर काही परात्पर गुरु झाले. एक सहस्रांहून (१ सहस्र ३६७) अधिक साधक जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले आणि ते संतपदाकडे वाटचाल करत आहेत. थोडक्यात साधक नदीतील पाण्यासारखे झुळझुळ वहात होते, म्हणजे साधना करत होते. गुरुदेवांनी ‘हे सर्व कसे केले ?’, ते साधकांना समजलेही नाही. गुरुदेवांची ही कृपा आम्हा साधकांच्या बुद्धीच्या पलीकडची आहे; म्हणून आपण सर्व साधक त्यांच्या चरणी पुनःपुन्हा शरण जाऊया.

अशा प्रकारे प.पू. बाबांच्या भजनांमधील एकेक कडवे आणि एकेक ओळ साधकांना पुनःपुन्हा गुरुदेवांकडे ओढत घेऊन जाते.

– श्री. विनायक शानभाग