१. रामनाथी आश्रम तीन वेळा पाहूनही भाच्याने प्रतिसाद न देणे
मी वर्ष २०१६ ते २०१८ मध्ये वर्षांतून दोन वेळा माहेरी जात असे. तेव्हा माझा भाचा श्री. अमोल सिद्धये (भावाचा मुलगा) मला आश्रमात न्यायला येत असे. तो आल्यावर मी त्याला आवर्जून आणि उत्साहाने आश्रम दाखवत असे. ‘मी त्याला ३ वेळा आश्रम दाखवला, तरीही त्याने मला आश्रमाविषयी काही सांगितले नाही किंवा कोणताच प्रतिसाद दिला नाही’, याचे मलाच आश्चर्य वाटले.
२. आश्रम पहाण्यात भाच्याला रस वाटत नसल्याचे त्याने सांगणे
मी त्याला चौथ्या वेळी आश्रम दाखवल्यावर विचारले, ‘‘अमोल, तुला आश्रम आवडला का ?’’ त्यावर तो मला म्हणाला, ‘‘आश्रम पुष्कळ छान आहे; पण खर सांगू का ? आत्या, मला आश्रम पहाण्यात रस वाटत नाही. तू कौतुकाने दाखवतेस आणि मी तो आनंदाने बघतो.’’ मग मी त्याला विचारले, ‘‘तुला कशात रस वाटतो ? तुला काय आवडले ?’, ते तरी सांग.’’
३. भाच्याला साधकांतील ‘नम्रता, प्रेमभाव आणि आनंदी रहाणे’, आदी गुणांमुळे पुनःपुन्हा आश्रमात यावेसे वाटणे
तेव्हा अमोलने मला सांगितले, ‘‘आत्या, मला इथली माणसे (साधक) पुष्कळ आवडली. ती सतत काम (सेवा) करत असतात, तरीही त्यांच्या तोंडवळ्यावर ताण किंवा आठ्या दिसत नाहीत. साधक आनंदी असतात. ते इतके उच्चशिक्षित असूनही नम्रतेने आणि साधेपणाने रहातात. साधकांकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की, यांतील काही साधक अभियंता, आधुनिक वैद्य आणि अधिवक्ता आहेत. विशेष म्हणजे ते माझ्यासारख्या सामान्य माणसाचाही आदर आणि विचारपूस करतात. ते स्वतः खाली बसून इतरांना आपली आसंदी देतात. आत्या, इथले साधक मला अतिशय आवडतात. इतकी आनंदी, नम्र आणि इतरांवर प्रेम करणारी माणसे अन्यत्र कुठेच भेटणार नाहीत. मी भोजनकक्षात बसून चहा पितांना साधकांना न्याहाळत असतो. तेव्हा मीही आनंदी होतो. मला साधकांना भेटायलाच पुनःपुन्हा इथे यावेसे वाटते.’’
मला अमोलचे हे उत्तर पुष्कळच आवडले.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवलेले आश्रमाचे सौंदर्य आणि मर्मस्थान असलेले सनातनचे साधक !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी किती सुंदर अन् गुणी साधक घडवले आहेत ! ‘हे गुरुदेवा (परात्पर गुरु डॉक्टर), साधना न करण्यार्या एका सामान्य जिवाला (भाच्याला) आश्रमाचे सौंदर्य आणि मर्मस्थान असलेले साधक अन् त्यांच्यातील ईश्वरी गुण लक्षात येणे’, ही तुमचीच लीला आहे. ‘देवा, तुमचे सर्व जिवांवर सारखेच प्रेम आहे’, हे पुन्हा एकदा मला शिकायला मिळाले.
५. प्रार्थना
‘गुरुदेवा, मला सर्व जिवांमध्ये तुमचे रूप पहायला शिकवा आणि मला सतत शिकण्याच्या स्थितीत ठेवा. मला तुम्हाला अपेक्षित असा चांगला साधक बनता येऊ दे’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे.
– तुमच्या चरणी शरणागत,
सौ. शालिनी प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |