गडचिरोली जिल्ह्यात ट्रक वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू !

पुराच्या पाण्यात वाहून गेलेला ट्रक

गडचिरोली – जिल्ह्यातील आलापल्लीवरून भामरागडला जातांना एक ट्रक ९ जुलै या दिवशी पुराच्या पाण्यात वाहून गेला. ट्रकमधून प्रवास करणार्‍या तिघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत.

अन्य घडामोडी

१. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी आश्रमशाळेत नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक विद्यार्थ्यांना दोरीच्या साहाय्याने पाण्यातून बाहेर काढण्यात आले, तर काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या तिसर्‍या मजल्यावर आसरा घेतला आहे. गाव परिसरातही पाणी आले.

२. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा गावातील आसना नदीचे पुराचे पाणी आणसाबाई सूर्यवंशी यांच्या घरात शिरले. रात्रभर पाण्यात राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

३. वर्धा जिल्ह्यातील बरांडा पुलगाव येथील नाल्याच्या पुरात ९ जुलैच्या रात्री २ अल्पवयीन मुले वाहून गेली. एकाचा मृतदेह सापडला. नदीला आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. एका ठिकाणी शेतात अडकलेल्या १३ महिला आणि १ पुरुष यांना बाहेर काढण्यात आले.

४. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडल्याने नदी आणि नाले यांसह ओढ्यांना पूर आला आहे.

भारतीय सैनिकाकडून पुरात अडकलेल्यांचे रक्षण !

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील टाकळी-पानवडाळा नाल्याला आलेल्या पुरात प्रवासी वाहनचालकाने निष्काळजीपणे वाहन घातले. वाहन पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी टपावर आश्रय घेतला. या गावातील नागरिकांसह भारतीय सैन्यातील सैनिक निखिल काळे यांनी भर पावसात वाहनातील ५ प्रवाशांना वाचवले. निखिल काळे यांनी प्रसंगावधान राखून केलेल्या बचावकार्याचे कौतुक केले जात आहे.