जलस्रोत खात्याचा आपत्कालीन व्यवस्थापनाची माहिती असलेला सर्व्हर ‘हॅक’ : ‘हॅकर्स’कडून ‘क्रिप्टोकरन्सी’ची मागणी

पणजी – ‘हॅकर्स’ने जलस्रोत खात्याचा आपत्कालीन व्यवस्थापनाची माहिती असलेला सर्व्हर ‘हॅक’ केला आणि खात्याकडे ‘हॅकर्स’नी माहिती पूर्ववत् उपलब्ध करण्यासाठी ‘बिटकॉइन’ आणि ‘क्रिप्टोकरन्सी’ यांची मागणी केली. जलस्रोत खात्याने या विरोधात २४ जून या दिवशी ‘सायबर क्राईम’ पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. ‘सायबर’ आक्रमणामुळे गायब करण्यात आलेली माहिती (डाटा) परत मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले जात आहेत.

विशेष म्हणजे जलस्रोत खात्याच्या ‘सर्व्हर’मध्ये आपत्कालीन व्यवस्थापन योजनेच्या अंतर्गत गोव्यातील नद्यांच्या मार्गावरील १५ महत्त्वाच्या ठिकाणांची पुरासंबंधी माहिती गोळा केली जात होती. यामध्ये पुरासंबंधी माहिती गोळा केलेले दिनांक, ‘ऑटोमेटेड रेन गेज’ आणि ‘वेदर गेज’ यांच्यासंबंधीची माहिती गोळा केली होती. हा मुख्य सर्व्हर पर्वरी येथे आहे आणि त्याचे व्यवस्थापन भाग्यनगरस्थित एक आस्थापन पहाते. हा सर्व्हर २४ घंटे इंटरनेट जोडणीवर चालतो आणि या ठिकाणी ‘अँटी व्हायरस’ नसल्याने आणि कालबाह्य ‘फायरवॉल्स’ असल्याने ‘हॅकर्स’ना ‘सर्व्हर’वर आक्रमण करणे सोपे झाले. जलस्रोत खात्याने ‘सर्व्हर’ला आणखी हानी पोचू नये, यासाठी भाग्यनगरस्थित आस्थापनाला उपाययोजना काढण्याचे आणि यंत्रणा अद्ययावत् करण्याची सूचना केली आहे.