गोव्यात आज अतीवृष्टी होण्याची चेतावणी

इयत्ता ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टी घोषित

पणजी, ७ जुलै (वार्ता.) – हवामान खात्याने गोव्यात ८ जुलै या दिवशी अतीवृष्टी होण्याची (रेड अलर्ट), तर ९ आणि १० जुलै या दिवशी मुसळधार पाऊस पडण्याची चेतावणी दिली आहे. जोरदार पावसासह प्रतिघंटा सुमारे ५० कि.मी. वेगाने वारे वहाण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. दक्षिण-पश्चिम आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र किनार्‍यापासून उत्तर केरळ किनार्‍यापर्यंत समुद्रसपाटीवर ‘ट्रफ’ची निर्मिती झाल्याने पश्चिम किनार्‍यावर दाब वाढला आहे. यामुळे हवामान खात्याने ८ जुलै या दिवशी गोव्यात अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारने इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ८ आणि ९ जुलै या दिवशी शाळेला सुट्टी घोषित केली आहे. सरकारची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा दक्ष आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. आवश्यकता नसतांना घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.

खोला, केपे येथील अंगणवाडीचे छप्पर कोसळले

६ जुलैच्या रात्री खोला, केपे येथील अंगणवाडीचे छप्पर कोसळले. या अंगणवाडीमध्ये आसपासची सुमारे ३० मुले येतात. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. सध्या या अंगणवाडीच्या मुलांना बसण्यासाठी दुसर्‍या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.