३३ मासांत एकही विद्यार्थी वर्गात न आल्याने प्राध्यापकाने परत केले पगाराचे अनुमाने २४ लाख रुपये !

नितिशेश्‍वर महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापक लालन कुमार

मुझफ्फरनगर (बिहार) – येथील नितिशेश्‍वर महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापक लालन कुमार यांनी गेल्या ३३ मासांत एकही विद्यार्थी त्यांच्या वर्गात न आल्यामुळे ते कुणालाच शिकवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ३३ मासांतील त्यांचा संपूर्ण पगार परत केला आहे. ३३ वर्षीय लालन कुमार यांनी २३ लाख ८२ सहस्र २२८ रुपयांचा धनादेश बी.आर्. आंबेडकर बिहार विद्यापिठात जमा केला आहे.

१. प्रा. लालन कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, माझा विवेक मला विद्यार्थ्यांना न शिकवता पगार घेण्याची अनुमती देत नाही. ऑनलाइन शिकवणी घेत असतांनाही काही मोजके विद्यार्थी उपस्थित असायचे. जर मी इतकी वर्ष काही न शिकवता पगार घेतला, तर हे माझ्यासाठी शैक्षणिक मृत्यू झाल्यासारखे आहे.

२. दुसरीकडे या महाविद्यायालयाचे प्राचार्य मनोज कुमार यांनी आरोप केला आहे, ‘लालन कुमार यांच्या पगार परत देण्यामागे केवळ विद्यार्थ्यांची अनुपस्थिती हे कारण नसून पदव्युत्तर विभागात स्थानांतर मिळवण्यासाठीचे दबावतंत्र आहे.’ लालन कुमार यांनी पदव्युत्तर विभागात स्थानांतरासाठी अर्ज केला आहे.