भ्रमणभाषचा वापर अल्प करा !

  • भ्रमणभाषचा शोध लावणारे मार्टिन कूपर यांचे लोकांना आवाहन

  • मार्टिन कूपर स्वतः दिवसभरातील केवळ ५ टक्के वेळ भ्रमणभाष वापरण्यासाठी देतात !

  • भ्रमणभाषमुळे लोकांच्या जगण्यातील आनंद हरवला असल्याचे मत !

भ्रमणभाषचा शोध लावणारे मार्टिन कूपर

न्यूयॉर्क – लोकांनी भ्रमणभाषचा वापर अल्प करावा, असे आवाहन भ्रमणभाषचा शोध लावणारे शास्त्रज्ञ मार्टिन कूपर यांनी एका मुलाखतीत केले. विशेष म्हणजे कूपर स्वतः दिवसभरातील केवळ ५ टक्के वेळ भ्रमणभाष वापरण्यासाठी देतात. मुलाखतीत कूपर यांना दिवसरात्र भ्रमणभाष वापरणार्‍या लोकांविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘अशा लोकांनी त्यांचा भ्रमणभाष बंद करून थोडे आयुष्य जगावे.’’ भ्रमणभाषच्या शोधानंतर आता ५० वर्षांनंतर मार्टिन यांना ‘भ्रमणभाषमुळे लोकांच्या जगण्यातील आनंद हरवला आहे’, असे वाटत आहे.

वर्ष १९७३ मध्ये भ्रमणभाषचा शोध लावला !

मार्टिन कूपर यांनी वर्ष १९७३ मध्ये सर्वप्रथम भ्रमणभाषचा शोध लावला. मोटोरोला आस्थापनाचा हा भ्रमणभाष २ किलो वजनाचा होता. तो भारित होण्यासाठी १० घंटे लागायचे आणि केवळ २५ मिनिटेच चालायचा. त्यानंतर तो पुन्हा भारित करावा लागत होता. या भ्रमणभाषची लांबी १० इंच इतकी होती.

संपादकीय भूमिका

विज्ञानामुळे अनेक शोध लागले. या शोधामुळे मनुष्याचे जीवन सुखकर होण्याचा दावा केला गेला; मात्र अंततः त्यामुळे होणारे दुष्परिणामच समोर आले. विज्ञानालाच सर्वस्व मानणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे !