मुंबई – मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी झालेल्या वाहतूककोंडीमुळे मुंबईत सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेले पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावर गाड्यांची गती मंद करण्यात आली होती.
१. मुंबईत विक्रोळी, वांद्रे, शीव, भायखळा, बोरिवली, कांदिवली, अंधेरी येथील भुयारी मार्ग, टिळकनगर टर्मिनस, टेम्बी पूल, कुर्ला येथील शेख मेस्त्री दर्गा, नेहरूनगर या भागांत पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.
२. पश्चिम द्रुतगती मार्गावरील विलेपार्ले, अंधेरी येथे वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावर मोठी वाहनांची रांग लागली. चेंबूर पोस्ट कॉलनी येथे अनेक घरांत पाणी शिरल्यामुळे नागरिकांना घरे सोडावी लागली. येथील रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.
३. कुर्ला येथील नेहरूनगर येथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. येथील वालावलकर शाळेमध्ये ३ फुटांपर्यंत पाणी भरले. दादर येथील हिंदमाता येथे पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था भूमीखाली करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिवर्षी सर्वांत पहिले पाणी साचणाऱ्या हिंदमाता येथे यंदा पाणी साचले नाही. पावसामुळे मुंबईत अनेक शाळा लवकर सोडण्यात आल्या. सायंकाळी पाऊस न्यून झाल्यामुळे मुंबईतील पाण्याची स्थिती नियंत्रणात आली.