न्यायदेवते, सर्वाेच्च न्यायालयातील अवचित घटनेचे पडसाद तुला समजले का ?

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचे न्यायदेवतेला अनावृत पत्र !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

१. नूपुर शर्मा प्रकरणाविषयी थोडेसे…!

न्यायदेवता डोळ्यांवर पट्टी बांधून एका हातात वजनकाटा आणि दुसर्‍या हातात तलवार घेऊन उभी आहे. त्यामुळे तिला दिसत नाही; पण ऐकू येते, असे तिच्या प्रतिमेवरून वाटते. ‘काल न्यायालयात अवचित घडले आणि देशभर त्याचे पडसाद उमटले. यातील तुला काही कळले का ? कदाचित् पहिल्यांदाच असा भूकंप झाला. तुझ्या हातातील वजनकाटा आणि तलवार थोडीतरी थरथरली का ?’, हा प्रश्न आम्हाला आहे. नूपुर शर्मा प्रकरण काय आहे, हे कदाचित् तुला ठाऊक नसेल. एका दूरचित्रवाणीवरील चर्चेमध्ये ती काहीतरी बोलली आणि मग ती कशी चुकीची बोलली, यावरून देशभरात आंदोलने चालू झाली. तिचे भ्रमणभाषवर ‘स्टेटस’ ठेवल्यामुळे उदयपूरमधील कन्हैयालाल यांचा गळा कापून हत्या करण्यात आली. नूपुर शर्मा यांच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी तक्रारी प्रविष्ट झाल्या. एकाच घटनेविषयी अनेक गुन्हे नोंद होऊ शकत नाहीत, असा खरेतर स्पष्ट कायदा आहे; पण त्यांच्या संदर्भात अनेक ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ते एकाच ठिकाणी वर्ग करण्यात यावेत, यासाठी शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. त्याची नुकतीच सुनावणी झाली.

२. कन्हैयालाल यांच्या हत्येसाठी नूपुर शर्मा यांचे विधान उत्तरदायी कसे ?

न्यायदेवते, तुझे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला या दोघांच्या पिठासमोर ही याचिका सुनावणीला आली. असे म्हणतात की, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शर्मा यांच्या अधिवक्त्याला खडे बोल सुनावले की, नूपुर शर्मा यांनी देशाची क्षमा मागायला पाहिजे; कारण आज देशात घडणार्‍या घटनांना नूपुर शर्मा याच उत्तरदायी आहेत. त्यांच्या याचिकेलाही उद्धटपणाचा वास येतो. याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि देशभरात त्याचे पडसाद उमटू लागले. तुला कदाचित् माहिती नसेल; कारण न्यायालयासमोर जेवढे येते, तेवढेच न्यायालय वाचते, हा तू घालून दिलेला दंडक किती पाळला जातो, ते तुलाच माहिती असावे !

न्यायमूर्तींच्या या मताविषयी ‘ट्विटर’वर निषेधाचे सूर जोरकसपणे उमटू लागले आहेत. ‘सुप्रीम कोर्ट काँप्रमाईज ब्लॅक इंडियन हिस्टरी, ब्लॅक इंडियन हिस्टरी’ चालू झाले आणि लोकांनी त्यांची मते न्यायपालिकेच्या विरोधात बेधडकपणे मांडली. ‘कन्हैयालाल यांच्या क्रूरपणे झालेल्या हत्येविषयी नूपुर शर्मा यांचे विधान उत्तरदायी कसे काय ?’, हा प्रश्न विचारला जाऊ लागला. ‘नूपुर शर्मा यांचे विधान कायद्याची कक्षा ओलांडणारे असेल, तर त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि पोलिसांनी त्याचे अन्वेषण करावे. त्यानंतर त्याचा न्यायनिवाडा न्यायाधीश करतील’, अशी भारताची परंपरा आहे. थोडक्यात कुणी कायदा ओलांडला, तर त्यावर शासन कृती करेल; पण इतरांनी कायदा ओलांडू नये, अशी रास्त भूमिका आजपर्यंत न्यायपालिकेने मांडलेली आहे. असे असतांना ‘कन्हैयालाल यांच्या हत्येसाठी नूपुर शर्मा यांचे विधान उत्तरदायी कसे काय असू शकते ?’, हा प्रश्न अनेकांना पडला. तो अद्यापही अनेकांच्या मनात असावा. त्याच्या प्रतिक्रिया कशा उमटल्या, हे मी तुला सांगतो.

३. नूपुर शर्मा यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेनंतर जनतेने व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया !

अ. कुणी लिहिले की, या न्यायाने अमेरिकेच्या ट्वीन टॉवरवरील ९/११ (९ सप्टेंबर २००१ च्या) च्या आतंकवादी आक्रमणाला त्या विमानाचा शोध लावणारे राईट बंधू उत्तरदायी आहेत. त्यांनी विमानाचा शोधच लावला नसता, तर आक्रमण झालेच नसते.

आ. एकाने लिहिले की, मुंबईत ताज हॉटेलवर जे आतंकवादी आक्रमण झाले, त्याला टाटा उत्तरदायी आहेत. टाटांनी हे हॉटेल बांधले नसते, तर आक्रमण झालेच नसते.

इ. कुणी लिहिले की, फाळणीनंतरचा हिंसाचार, काश्मीरमधील हिंसाचार, भारत-पाकिस्तानमधील सैनिकांचे मृत्यू यांना ‘भारताला स्वातंत्र्य मिळावे’, ही मागणी करणाराच उत्तरदायी आहे. स्वतंत्र भारताची मागणी झालीच नसती, तर या घटना घडल्याच नसत्या. या तर साध्या प्रतिक्रिया आहेत.

ई. काही लोकांनी तर पूर्वी येऊन गेलेल्या ‘अंधा कानून’ या हिंदी चित्रपटाची भित्तीपत्रके ‘ट्विटर’ वर पोस्ट केली आहेत. काही मासांपूर्वी कर्नाटकात जिहादी आतंकवाद्यांनी हर्षल नावाच्या तरुणाची हत्या केली. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यासंदर्भात एकाने लिहिले की, हर्षच्या आईने त्याला जन्म दिला नसता, तर त्याची हत्या झालीच नसती. त्यामुळे त्याच्या हत्येला तीच उत्तरदायी !

उ. एकाने लिहिले की, भाषणामुळे दंगली उसळल्या. त्यामुळे दंगलीसाठी भाषण उत्तरदायी; पण दंगलखोरांची कृती दंगलखोरांना दोषी ठरवणार नाही. असे लिहिणारे जोकर आहेत का ? हे म्हणजे कोल्ह्याच्या निगराणीत कोंबडीची पिल्ले ठेवण्यासारखे आहे का ?

४. न्यायदेवते, प्रतिक्रिया देणार्‍यांना क्षमा कर !

न्यायदेवते, यापुढचे मी तुला सांगत नाही, कदाचित् ते तुला ऐकवणार नाही. असे लिहिणार्‍या या शेकडो लोकांनी ‘न्यायालयाचा अवमान केला आहे का ?’, हा खरा प्रश्न आहे. बापडे कायद्याचे अज्ञानी आहेत. त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांना समजायला पाहिजे होते की, सर्वोच्च न्यायालय कधीही चुकत नसते. सर्वोच्च न्यायालय काय बोलते, हे त्यांनाच कळते, तरीही त्यांनी अशा पद्धतीने भावना व्यक्त केल्या आहेत. न्यायदेवते, त्यांना क्षमा कर ! तसे तू त्यांना क्षमा करशील; कारण कोरेगाव भीमा प्रकरणी निवाडा करतांना तुझ्याच एका न्यायाधिशाने लिहून ठेवले की, निषेध म्हणजे समाजाची ‘सेफ्टी वॉल’ (संरक्षक भिंत) आहे. ती बंद केली, तर ‘प्रेशर कुकर’ फुटल्याप्रमाणे समाजाचा उद्रेक होईल. त्यामुळे तू अशा प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍यांना क्षमा करशील.

५. क्रांती घडत आहे, आता काय करायचे ?

त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला; म्हणून तू शिक्षा करायची ठरवली, तर ‘न्यायालयात किती जणांना बोलावणार ?’, हाही प्रश्न आहेच; कारण यावर सहस्रोंच्या संख्येत निषेध व्यक्त झाला आहे. एखाद्याने कायदा मोडला, तर तो गुन्हा असतो. जेव्हा लाखो लोक तो मोडतात, तेव्हा त्याला ‘क्रांती’ म्हटले जाते. त्यामुळे तुलाही प्रश्न पडला असेल की, आता याचे करायचे काय ? पण याचाही विचार करायला पाहिजे की, हे असे का झाले ?

६. सर्वोच्च न्यायालयाचा अनादर होत असल्याच्या भीतीने निवेदिकेने कार्यक्रम १० मिनिटांमध्ये गुंडाळणे

मला ६-७ वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. ‘उज्जैनच्या महाकाल मंदिरातील शिवपिंडीवर ‘आर्.ओ.’ (रिव्हर्स  ऑस्मोसिस – पाणी शुद्ध करण्याची एक प्रक्रिया) पाण्याने अभिषेक करावा’, असा सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला होता. त्यासंदर्भात मला कुठल्या तरी दूरचित्रवाहिनीवर चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. तेव्हा निवेदिकेने प्रथम २ मिनिटे ‘कुणाकडूनही सर्वाेच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही’, याविषयीचे गुर्‍हाळ ऐकवले. ते संपल्यावर प्रथम तिने पुरोहितांना त्यांचे मत मांडायला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान हा विषय असल्यामुळे बिचारे पुरोहितही २-२ वेळा ‘सर्वोच्च न्यायालयाचा आदर, सर्वोच्च न्यायालयाचा आदर’, असे बोलून थांबले. मग तिने मला विधीज्ञ म्हणून माझे मत विचारले. मी स्पष्टच सांगितले की, अयोध्या मंदिर, ‘युनिफॉर्म सिव्हिल कोड’ (समान नागरी कायदा) असे अनेक विषय प्रलंबित असतांना सर्वोच्च न्यायालय या विषयाला वेळ का देते ?’, हाच खरा प्रश्न आहे. दुसरे असे की, हे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने वेळ देण्यासारखे नाहीत; कारण हा धार्मिक श्रद्धेचा भाग असल्याने त्यावर पुरोहितांनी ठरवले पाहिजे. निवेदिका अवमानाच्या भीतीने इतकी घाबरली होती की, तिने तो कार्यक्रम १० मिनिटांमध्ये गुंडाळला, म्हणजेच आमच्याकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होऊ नये, अशी दूरचित्रवाणीची भावना होती.

७. लोकांच्या भावना दुखावल्या, तर त्याचा काही इलाज नाही !

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या विधानाने समाजाच्या भावनांना जो काही धक्का बसला आहे आणि ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यात तू योग्य पद्धतीने समजून घे. तसे तू घेशील, अशी मला आशा आहे. हे सूत्र येथेच थांबेल, असे सांगता येत नाही. न्यायमूर्तींनी ही विधाने मागे घ्यावीत, यासाठी कुणीतरी सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठवल्याचे म्हटले जाते. यापूर्वी ‘न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या न्यायदानाची, तसेच त्यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का ? याची चौकशी केल्याविना त्यांना बढती देऊ नये’, असे पत्र सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती ए.के. गोयल यांनी दिले होते. न्यायमूर्ती पारडीवाला यांचे वडील काँग्रेसचे आमदार होते, याची सोयीस्कर आठवण आता कुणी काढत आहे. लोकांच्या भावना दुखावल्या, तर त्याचा काही इलाज नाही.

८. न्यायपालिका पक्षपाती वागते का ?

‘नूपुर शर्मा यांच्यावरील तक्रारींचे एकाच पोलीस ठाण्यात अन्वेषण व्हावे’, ही मागणी काही नवीन होती, असे नाही. यापूर्वीही हिंदूंच्या भावना दुखावणार्‍या मकबूल फिदा हुसेनच्या विरोधात झालेल्या तक्रारी एका ठिकाणी आणल्या गेल्या होत्या. इतकेच नव्हे, तर देहली उच्च न्यायालयाने त्या रद्दबातलही केल्या होत्या. झाकीर नाईक याने गणपतीविषयी चुकीचे उद्गार काढून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. ‘त्याच्या विरोधात झालेल्या तक्रारी एकाच ठिकाणी आणाव्यात’, अशी याचिका करण्यात आली होती. त्यामुळे नूपुर शर्मा यांनी त्यांच्या विधानाविषयी उघड क्षमा मागायला हवी, हा कुठल्या कायद्यातील उपाय आहे, ते निदान लोकांना सांगितले पाहिजे. तसे नसेल, तर काही वेळा ‘न्यायपालिका पक्षपाती वागते’, असे लोकांना वाटल्यास त्यांचा समज दूर कसा करणार ?

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद (२.७.२०२२)