सर्वश्रेष्ठ नवविधा भक्ती !

एके दिवशी हिरण्यकश्यपूने त्याच्या पुत्राला मांडीवर घेऊन विचारले की, बाळ प्रल्हादा, इतके दिवस तू गुरुजींकडून जे ज्ञान प्राप्त केलेस त्यांपैकी काही चांगल्या गोष्टी मला सांग. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, ‘‘भगवान विष्णूंच्या भक्तीचे ९ प्रकार आहेत’’, असे म्हणून त्याने नवविधा भक्तीचे प्रकार हिरण्यकश्यपूला सांगितले.

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ।।

अर्थ : श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे ९ प्रकार आहेत. या ९ प्रकारांनाच नवविधा भक्ती असे म्हणतात.

१. श्रवणभक्ती : भगवंताच्या यश, गुण, माहात्म्य इत्यादी गोष्टी श्रद्धायुक्त अंत:करणाने ऐकणे ही श्रवणभक्ती होय.

२. कीर्तन : कीर्तनात जे वातावरण निर्माण होते, त्यात भावविवशता आणि आनंदमयता आपोआप प्राप्त होते.

३. स्मरणभक्ती : सतत भगवंताचे स्मरण करणे ही स्मरणभक्ती होय.

४. पादसेवनभक्ती : देवता किंवा गुरु यांच्या चरणांचे पूजन किंवा स्मरण ही पादसेवनभक्ती होय.

५. अर्चनभक्ती : श्रद्धा आणि आदर यांनी युक्त अशी पूजा करणे याला अर्चनभक्ती म्हणतात.

६. वंदनभक्ती : भगवंताच्या पुढे नतमस्तक होऊन त्याच्या अनंत महिम्यांचे अंतरात ध्यान करत, त्याची स्तुती करणे याला वंदनभक्ती म्हणतात.

७. दास्यभक्ती : श्रीहरि हाच माझा मायबाप आहे, प्रभु सर्वकाही आहे आणि मी त्याचा सेवक आहे, ही दास्यभक्ती आहे.

८. सख्यभक्ती : परमात्मा हा माझा मित्र आहे, साथी आहे, बंधू आहे, अशा प्रकारे भक्ती करणे, याला सख्यभक्ती म्हणतात.

९. आत्मनिवेदन : ही भक्तीची सर्वोच्च पायरी आहे. यामध्ये सर्वस्वी शरण जाणे होय. आपला सर्व भार प्रभूवर टाकणे, याला आत्मनिवेदन असे म्हणतात. आत्मनिवेदन भक्ताला अशा अवस्थेत घेऊन जाते की, तेथून त्याला सर्व विश्वच भगवन्मय होऊन जाते.

अशी ही नवविधा भक्ती आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाते. यातील पहिले ३ प्रकार परमेश्वराप्रती श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी साहाय्यक ठरतात. पुढचे ३ हे भगवंताच्या सगुण रूपांशी संबंधित आहेत आणि शेवटचे तीन हे आंतरिक भाव आहेत. पहिल्या तिन्हीत नामाला विशेष महत्त्व आहे. (साभार – संकेतस्थळ)


आत्मनिवेदनाचे महत्त्व !

जे होत आहे, ते सांगत रहावे. आत्मनिवेदन महत्त्वाचे आहे. त्यामुळे जे होत आहे, ते चूक कि बरोबर हे सांगता येते. नाहीतर ‘मला येते, मला कळते’, असे होते.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


भक्तीरसाचा सुगंध देणारे देवर्षि नारद !

देवर्षि नारद हे भगवान विष्णूंचे मोठे भक्त आहेत. हिंदु धर्मात त्यांना ब्रह्माचे पुत्र मानले जाते. नारदमुनी हे ब्रह्मदेवाच्या ७ मानसपुत्रांपैकी एक आहेत. ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या वरदानानुसार, आकाश, पाताळ तसेच पृथ्वी या तीनही लोकी भ्रमण करून नारदमुनी देव, संत-महात्मे, इंद्रादी शासक आणि जनमानसाशी थेट संवाद साधत असत.

नारदमुनी यांच्या एका हातात वीणा असते, तर एका हातात चिपळ्या. ते दिवसभर नारायण-नारायणाचा जप करतात आणि सतत भ्रमण करत. त्यांच्या या ‘नारायण, नारायण…’ जयघोषानेच त्यांच्या आगमनाची सूचना सर्वांना प्राप्त होत असे. यातून ते मुळात भक्तीचा प्रसार करत. कीर्तनभक्तीचे श्रेय नारदमुनींना देण्यात येते. नारदमुनी हे जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे, भक्तीरसाचा सुगंध देणारे मुनी आहेत. भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, राजा अंबरिष, महर्षि वाल्मिकी आदी महान व्यक्तिमत्त्वांना भक्तीमार्गावर घेऊन जाण्याचे श्रेय नारदमुनींनाच जाते. भक्ती म्हणजे काय ? हे जगाला पटवून सांगणारे देवर्षि नारद धर्मशास्त्रांमध्ये पारंगत आहेत. त्यांनी नारद पुराणाची रचना केली आहे. (साभार – संकेतस्थळ)


नवविधा भक्ती साध्य करून देणारी वारी !

पदोपदी भगवंताचे कीर्तन करणे म्हणजे वारी. ‘भजन, नामस्मरण आणि कीर्तन यांच्या माध्यमातून परमेश्‍वराला प्राप्त करणे’, हा वारकरी पंथाचा सरळसोपा मार्ग आहे. भागवत संप्रदायात याला ‘नवविधा भक्ती’ म्हणतात. या ९ भक्ती एक ‘वारी’ केल्यास सिद्ध होतात अन् ‘याची देही याची डोळा’ माणसाचे जीवन कृतार्थ होते. हा वारीचा मूळ गाभा आहे. (संदर्भ : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०१७)