गुरुकार्याचा ध्यास असलेल्या सनातनच्या ११९ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार !

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांची वर्धा येथील साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

१. अंतर्मुख

‘डगवारकाकू नियमित व्यष्टी साधना करतात. त्या प्रतिदिन स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या लिखाणाच्या सारणीत ८ ते १० प्रसंग आणि शिकायला मिळालेली सूत्रे लिहितात. यातून काकूंची प्रत्येक प्रसंगातील अंतर्मुखता लक्षात येते आणि आपल्यालाही तसे प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. त्यांची सारणीलिखाणाची वही बघून चांगले वाटते.

२. विचारून करणे

काकूंना सत्संगात आल्यावर ‘विचारून घेण्या’चे महत्त्व कळले. तेव्हापासून त्या साधनेतील प्रत्येक सूत्र विचारून घेऊन करण्याचा प्रयत्न करतात.

३. इतरांचा विचार करणे

त्यांनी सत्संग नियमितपणे होण्यासाठी प्रयत्न केले. त्या सर्वांना सत्संगाची आठवण करून द्यायच्या आणि सर्वांच्या सोयीनुसार सत्संगाच्या वेळा ठरवायच्या. त्यांनी कधीही ‘स्वतःच्या वेळेप्रमाणे काही व्हावे’, अशी अपेक्षा ठेवली नाही.

४. स्वतःकडे न्यूनता घेणे

त्या साधकांशी बोलतांना किंवा एखाद्या प्रसंगात सूत्र सांगतांना स्वतःकडे न्यूनपणा घेऊन बोलतात.

५. चुकांविषयी संवेदनशीलता

व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतांना त्या शक्य तितक्या अधिकाधिक चुकांसाठी प्रायश्चित्त घेतात, तसेच प्रत्यक्ष आणि मानसरित्या संबंधित साधकांची पाय धरून क्षमायाचना करतात. यातून काकूंना समष्टी साधनेत झालेल्या चुकांविषयी वाटणारी खंत आणि गांभीर्य लक्षात येते.

६. गुरुकार्याचा ध्यास

अ. साधनेला आरंभ केल्यानंतर काकूंनी त्यांच्या नातेवाइकांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार केले. त्यामागे त्यांचा ‘गुरुकार्याचा प्रसार व्हावा आणि सर्वांना साधनेचे महत्त्व कळावे’, हा हेतू होता. त्या ‘‘सनातन प्रभात’मधील काय आवडले ?’, असे नातेवाइकांना विचारायच्या. त्यामुळे नातेवाईक ‘सनातन प्रभात’चे वाचन करायचे. काकूंच्या नातेवाइकांनी नंतर साधनेला आरंभ केला आणि आता ते सेवाही करत आहेत. काकू नातेवाइकांशी बोलतांना नेहमी साधनेविषयी बोलत असत. त्यामुळे त्यांनाही साधनेची गोडी निर्माण झाली.

आ. डगवारकाकांचे निधन झाल्यानंतर काही दिवसांतच काकूंनी सेवेला आरंभ केला. काकूंना काही कार्यालयीन कामांसाठी सकाळपासून बाहेर जावे लागत असे. तेव्हाही त्या शक्य होईल, तेव्हा स्वतःला सत्संगाशी जोडण्याचा प्रयत्न करत असत.

७. सूक्ष्मातील जाणणे

अ. काकू आमच्या आवाजातील चढ-उतार ऐकूनच ‘आमच्या मनात नेमके काय चालू आहे ?’, हे विचारून घेऊन ‘कुठल्या स्वभावदोषावर उपाय करायचे ?’, ते मोकळेपणाने सांगायच्या.

आ. मला अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे ‘काकूंशी बोलू नये’, असे वाटायचे. मी त्यांच्याशी बोलणे टाळत असे. त्या वेळी काकू मला स्वतःहून भ्रमणभाष करायच्या. काकू मला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेली साधनेविषयीची सूत्रे किंवा गुरुमाऊलींविषयी सांगत असत. काकूंशी बोलल्यावर माझे मन सकारात्मक होऊन मला उत्साह जाणवत असे.

८. प्रारंभी साधनेला विरोध करणार्‍या यजमानांना साधना करायला प्रवृत्त करणे

आरंभी काकूंच्या यजमानांचा काकूंच्या साधनेला विरोध होता. काकूंनी ते स्वीकारून नंतर यजमानांनाही साधनेला लावले. डगवारकाका पूर्वी काकूंना दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम पहाण्यासाठी बसायला सांगायचे. तेव्हा काकू त्यांच्यासमवेत दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम पहायला बसून त्या वेळी स्वतःची व्यष्टी साधना पूर्ण करायच्या.

काकांनी व्यष्टी साधनेचे प्रयत्न चालू केल्यावर काकू त्यांना ‘नामजप, मंत्रजप, प्रार्थना करणे, स्तोत्र ऐकणे, स्वयंसूचना सत्रे करणे’ आदी गोष्टींची आठवण करून देत असत आणि स्वतःही त्यांच्या समवेत करत असत.

९. भाव

९ अ. ‘देवच सेवा करवून घेणार आहे’, असा भाव असणे : त्या प्रत्येक सेवा झोकून देऊन करण्याचा प्रयत्न करतात. सेवेत अडचण आल्यास त्या इतरांचे साहाय्य घेऊन सेवा पूर्ण करतात. त्या सेवा करतांना सतत देवाला शरण जातात. त्यांचा ‘सेवा देवच करवून घेणार आहे’, असा भाव असतो.

९ आ. एकदा लिखाण करत असतांना काकूंचे हात दुखत होते. तेव्हा त्यांनी ‘श्रीकृष्ण माझा हात धरून माझ्याकडून लिहून घेत आहे’, असा भाव ठेवून लिखाण पूर्ण केले.

९ इ. ‘मुलीची काळजी देवच घेणार’, असा भाव असणे : काकूंची मुलगी कु. मयुरी साधना करण्यासाठी आश्रमात गेली. काकूंना तिची आठवण आल्यावर ‘ती देवाच्या छत्रछायेखाली आहे आणि देवच तिची काळजी घेणार आहे. मायेतील विचार करायला नको’, असा विचार त्या करत असत.

९  ई. यजमानांच्या निधनानंतर ‘गुरुमाऊलींच्या कृपेमुळे स्थिर राहू शकत आहे’, असे सांगणे : काकांच्या निधनानंतर त्यांचा पार्थिव देह समोर असतांना काकू स्थिर राहून नातेवाइकांना धीर देत होत्या. काकूंना याविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘मलाच कळले नाही की, मी इतकी स्थिर कशी राहू शकले ? हे केवळ गुरुमाऊलीच करवून घेत आहे.’’

१०. संतांनी कौतुक करणे

डगवारकाकू प्रत्येक प्रसंगातून शिकण्याचा प्रयत्न करतात. काकूंमधील ‘शिकण्याची वृत्ती’ या गुणाचे पू. अशोक पात्रीकर यांनी एका सत्संगात भरभरून कौतुक केले. त्या वेळी ‘अध्यात्मात गुरु त्यांच्या शिष्याचे कौतुक करतात’, हे मला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले. त्या वेळी मला वातावरण आनंदी वाटले, तसेच ‘मी भूवैकुंठात आहे’, असे मला जाणवले.’

(समाप्त)

– कु. अर्चना निखार, वर्धा

(लेखातील सर्व सूत्रे पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार संतपदी विराजमान होण्यापूर्वीची असल्याने त्यांना ‘पूज्य’ असे संबोधले नाही.)

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक १५.१२.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक