जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश
सोलापूर, ३० जून (वार्ता.) – आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर शहर आणि परिसर येथे सार्वजनिक शांतता राखण्यासाठी मद्यबंदी अधिनियमातील कलम १४२ अन्वये ९ जुलै ते ११ जुलै २०२२ या कालावधीत शहरासह आजूबाजूच्या ५ किलोमीटर परिसरातील सर्व देशी, विदेशी मद्य आणि ताडी विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. (पवित्र देवस्थान असलेल्या पंढरपूर शहरात केवळ यात्रा कालावधीत नाही, तर कायमचीच मद्यबंदी आवश्यक आहे. – संपादक)
१२ जुलै आणि १३ जुलै या २ दिवशी पंढरपूर शहर आणि शहरापासून ५ किलोमीटर अंतराच्या परिसरातील सर्व मद्यविक्रीची दुकाने सायंकाळी ५ नंतर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक आहे.