५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील चि. अभिराम मेनन (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. अभिराम मेनन हा या पिढीतील एक आहे !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. जन्मापूर्वी

चि. अभिरामच्या वेळी मी गरोदर असतांना मला प्रथमच श्रीरामाविषयी भाव जाणवत होता. ‘बाळाच्या जन्मानंतर त्याचे नाव श्रीरामाशी संबंधित असावे’, असा विचार तीव्रेतेने माझ्या मनात आला.

२. जन्म ते १ वर्ष

२ अ. सात्त्विक गोष्टींची आवड असणे

१. चि. अभिराम काही महिन्यांचा असतांना तो सात्त्विक संगीत, उदा. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने, कीर्तन किंवा कर्नाटक संगीत लक्षपूर्वक ऐकत असे आणि ते ऐकतच झाेपी जात असे.

२. श्रीकृष्ण, श्रीराम आणि हनुमान यांच्या चित्रांकडे अन् गाण्यांकडे अभिराम आकर्षिला जात असे. कधी कधी तो मला श्रीकृष्ण आणि श्रीराम यांची गाणी म्हणायला सांगत असे.

२ आ. सहनशील : अभिराम ३ मासांचा असतांना त्याला त्वचारोग (एक्झीमा) झाला होता. नंतर तो बळावल्यामुळे त्याच्या अंगाला पुष्कळ खाज येत असे आणि जळजळही होत असे. त्यामुळे अभिराम रात्री केवळ ३ – ४ घंटेच झोपू शकत होता. असे असले, तरी तो सकाळी हसतच उठायचा. त्या आजारामुळे दिवसासुद्धा त्याला अस्वस्थता जाणवत असली, तरी तो आनंदाने खेळत असायचा.

३. दीड ते ४ वर्षे

३ अ. उत्तम स्मरणशक्ती आणि आकलनक्षमता : आम्ही एकत्र कुटुंबात रहात असल्यामुळे मी परात्पर गुरु डॉक्टर आणि प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे घरात ठेवलेली नाहीत. अभिराम दीड वर्षाचा असतांना मी त्याला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र दाखवले होते. त्यानंतर साधारण ६ मासांनी जेव्हा त्याने परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पुन्हा पाहिले, तेव्हा त्याने परात्पर गुरु डॉक्टरांना लगेच ओळखले. त्याने अक्षरे, अंक आणि बेरीज करणे लवकर शिकून घेतले.

३ आ. अभिराम इतर मुलांशी लगेच जुळवून घेतो.

३ इ. त्याला खाण्याविषयी आवड-नावड नाही. तो समाधानी वृत्तीचा आणि आनंदी आहे.

३ ई. स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे : अभिराम प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी ‘दिवसभरात त्याच्याकडून किती आणि कोणत्या चुका झाल्या ?’, हे मला अचूकपणे सांगतो. स्वभावदोष-निर्मूलनासाठी तो आवडीने स्वयंसूचनांची सत्रे करतो.

३ उ. शरिरावर दैवी कण दिसणे

१. अभिराम २ वर्षांचा असतांना एकदा सूर्यग्रहण होते. त्या रात्री पुष्कळ त्रास जाणवत होता. त्यामुळे तो नीट झोपू शकला नव्हता; परंतु दुसर्‍या दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे हसतच उठला. त्या वेळी त्याच्या कपाळावर निळ्या रंगाचा दैवी कण आढळला. त्यानंतरही काही वेळा मला त्याच्या अंगावर निळ्या रंगाचे दैवी कण दिसले आहेत.

२. काही मासांपासून अभिरामच्या शरिरावर रूपेरी, सोनेरी आणि मोरपंखी या रंगांचे दैवी कण दिसत आहेत.

३ ऊ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत असलेल्या प्रायश्चित्तपद्धतीबद्दल कुणीही सांगितलेले नसतांनाही तसे प्रयत्न करणे

१. एकदा अभिराम पुढीलप्रमाणे गुणगुणत होता, ‘चूक केल्यानंतर स्वतःला चिमटा काढावा.’ ते ऐकून मला पुष्कळ आश्चर्य वाटले; कारण मी प्रायश्चित्तपद्धतीविषयी त्याला कधीही सांगितलेले नव्हते. मी त्याला त्याचा अर्थ विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘स्वतःकडून चूक झाल्यानंतर (‘ती पुन्हा होऊ नये’, यासाठी) आपण स्वतःच्या हातावर किंवा गालावर चिमटा काढायचा.’’

३ ए. सत्संगाची आवड : अभिरामला माझ्या समवेत ‘ऑनलाईन’ सत्संग किंवा कार्यशाळा यांना उपस्थित रहायला आवडते. त्यात सांगितलेली सर्व सूत्रे तो लक्षपूर्वक ऐकतो. तो मनोभावे प्रार्थना करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो.

३ ऐ. घरातील वातावरण बिघडत असतांना ते चांगले होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करणे

१. कधी कधी घरातील वातावरण बिघडले असतांना अभिराम अकस्मात् स्मित करू लागतो. एकदा असेच तो हसत असतांना मी त्याला त्याचे कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मांडीवर बसलो आहे’, अशी मी कल्पना केली.’’ ते ऐकून माझीही भावजागृती झाली आणि घरातील वातावरणही सकारात्मक झाले.

२. एकदा माझे यजमान अभिरामच्या समोर अर्जुनला (अभिरामच्या मोठ्या भावाला) रागावत होते. त्यामुळे घरातील वातावरण बिघडत चालले होते. त्या वेळी अभिराम शांतपणे ‘राम, राम, राम’, असा जप करू लागला. तेव्हा माझे यजमान शांत झाले आणि घरातील वातावरणही चांगले झाले.

३ ओ. ‘श्रीकृष्ण, श्रीराम आणि परम पूज्य, हे माझे आध्यात्मिक मित्र आहेत’, असे सांगणे : अभिरामला ‘आध्यात्मिक’ या शब्दाचा अर्थ ठाऊक नाही, तरीही ‘तुझे आध्यात्मिक मित्र कोण आहेत ?’, असे विचारल्यावर तो सांगतो, ‘‘श्रीकृष्ण, श्रीराम आणि परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले)! श्रीकृष्ण, श्रीराम आणि परम पूज्य एकच आहेत.’’ कधी कधी तो त्यांच्याशी खेळतो.

३ औ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत यांच्याप्रतीचा भाव

१. वर्ष २०२० मध्ये झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाचे छायाचित्र मी अभिरामला दाखवले. ते पाहून त्याने दोन्ही हात जोडले आणि परात्पर गुरु डॉक्टरांना उद्देशून तो ‘श्रीराम’, असे म्हणाला. त्याची ती भावस्थिती काही काळ टिकून होती.

२. एकदा मी अभिरामला ‘तुला परम पूज्यांची आठवण येते का ?’, असे विचारले. त्या वेळी तो म्हणाला, ‘‘मला परम पूज्य फार आवडतात. ‘माझी कामे कशा प्रकारे करू ? मी आईला कसे साहाय्य करू ?’, असे मी त्यांना नेहमी विचारत असतो. तेही मला ‘पंख्याजवळ जाऊ नकोस. पायर्‍या चढतांना किंवा उतरतांना सावधगिरी बाळग’, असे सांगतात.’’ तो वेगवेगळ्या वेळी सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांशी बोलत असतो आणि त्या त्या वेळी ‘त्यांनी कोणत्या रंगाचे कपडे घातले होते ?’, हे सांगतो.

३. अभिराम सद्गुरु सिरियाक वाले यांनाही ‘परम पूज्य’ म्हणतो. मी त्याला सद्गुरु सिरियाक वाले आणि परात्पर गुरु डॉक्टर या दोघांचे छायाचित्र दाखवून दोघांनाही ‘परम पूज्य’ म्हणण्याचे कारण विचारल्यावर त्याने सांगितले, ‘‘परम पूज्य’ सद्गुरु सिरियाक वाले यांच्या हृदयात आहेत.’’ पू. देयानदादांच्या (एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. देयान ग्लेश्चिच यांच्या) संदर्भातही त्याला तसेच वाटते.

४. जाणवलेला पालट 

स्वयंसूचना घेतल्यानंतर अभिरामच्या ऐकण्याच्या वृत्तीत वाढ होणे : अभिरामला स्वतःच्या कपड्यांविषयी पुष्कळ आवडी-निवडी असायच्या. त्यामुळे घरात असतांना किंवा बाहेर कुठे जायचे असल्यास त्यात पुष्कळ वेळ वाया जायचा. त्याने त्यावर स्वयंसूचना घेतल्यानंतर त्याची ऐकण्याची वृत्ती वाढली आहे. आता तो आम्ही सांगितलेले कपडे घालतो.

५. अभिराममधील स्वभावदोष 

राग येणे (सध्या यावर स्वयंसूचना घेत आहे.), मस्ती करणे आणि हट्टीपणा.’

– सौ. शिल्पा गोल्लामुडी-मेनन (आई), कॅलिफोर्निया, अमेरिका. (१४.७.२०२१)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक