अमरावती येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ३ बंदीवान पसार !

अमरावती – येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून २८ जून या दिवशी पहाटे ३ बंदीवान पसार झाले आहेत. अतिशय कडेकोट बंदोबस्त असतांनाही हे बंदीवान पसार झाले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी केली जात आहे. साहिल अजमल कासकेकर, रोशन उईके आणि सुमित धुर्वे अशी पसार बंदीवानांची नावे आहेत.

कारागृहातील प्रार्थना सभागृहाला कोठडीत परिवर्तित करून त्यामध्ये काही बंदीवानांना ठेवण्यात आले होते. बंदीवान लोखंडी फाटकाचे गज वाकवून त्यातून बाहेर पडले. त्यांनी चादरीच्या साहाय्याने कारागृहाची भिंत चढून तेथून पळ काढला. कारागृहात ९३८ बंदीवानांना ठेवण्याची क्षमता असतांना तेथे सध्या अनुमाने १ सहस्र ५०० बंदीवान रहात आहेत. त्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय अल्प आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांचा बंदोबस्त असतांना बंदीवान पसार होणे हे लज्जास्पद ! उत्तरदायी पोलीस कर्मचाऱ्यांना कामावरून काढून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करायला हवी.