काश्मीरमधील हिंदूंचे सुरक्षित स्थलांतर करा !

  • काश्मिरी हिंदूंच्या संघटनेची जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयात याचिका

  • केंद्र सरकार आणि राज्य प्रशासन काश्मिरी हिंदूंचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप

जम्मू (जम्मू-काश्मीर) – काश्मिरी हिंदूंची संघटना ‘कश्मिरी पंडित संघर्ष समिती’ने जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाला पत्र पाठवून याचिका प्रविष्ट केली आहे. यात काश्मीर खोर्‍यात धार्मिक अल्पसंख्यांकांना आतंकवाद्यांकडून धोका आहे. त्यामुळे त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर ४ जुलैला सुनावणी होणार आहे. ‘कश्मिरी पंडित संघर्ष समिती’ काश्मीरमधील २७२ गावांमध्ये रहाणार्‍या ८०८ कुटुंबियांचा एक समूह आहे. या कुटुंबांनी वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवादी कारवायांनंतरही काश्मीर खोर्‍यातून पलायन केले नव्हते. संजय टिक्कू हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

‘कश्मिरी पंडित संघर्ष समिती’चे ट्विट –

धार्मिक अल्पसंख्यांकांचे जीवन सुरक्षित ठेवण्यात केंद्र सरकार अपयशी !

‘कश्मिरी पंडित संघर्ष समिती’ने प्रविष्ट केलेल्या या याचिकेत पुढे म्हटले आहे की, काश्मीर खोर्‍यात सध्या आतंकवादी कारवाया वाढत असतांना सरकार आम्हाला येथून स्थलांतर करण्याची अनुमती देत नाही. ही सरकारची असंवेदनशीलता आहे. आतंकवाद्यांनी भित्तीपत्रके आणि पत्र प्रसारित करून काश्मीरमधील हिंदूंना ठार करण्याची धमकी दिली आहे. केंद्र सरकार आणि राज्य प्रशासन धार्मिक अल्पसंख्यांकांचे जीवन सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरले आहे.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? सरकारला हे स्वतःहून का कळत नाही ?