लोणंद (जिल्हा सातारा) येथे मनोरंजनासाठी विनाअनुमती पाळणे आणि झोपाळे यांची उभारणी !

सातारा, २७ जून (वार्ता.) – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद (जिल्हा सातारा) येथील गोटे माळाजवळ विनाअनुमती मनोरंजनासाठी विविध पाळण्यांची उभारणी केली जात आहे. ‘अर्थ’पूर्ण तडजोडी करून हे पाळणे चालू केले जाणार असल्याने याविषयी नागरिकांकडून प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. (जे नागरिकांना समजते, ते प्रशासनाला का लक्षात येत नाही ? तसेच नागरिकांना तक्रारी का कराव्या लागतात ? – संपादक)

लोणंद शहरात या वर्षी पालखीचे २ मुक्काम आहेत. यामुळे लोणंद नगरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याचाच आर्थिक लाभ घेण्यासाठी पालखीच्या काळात मनोरंजनासाठी कोणतीही अनुमती न घेता मोठमोठे पाळणे, झोपाळे आदी उभारण्यात येत आहेत. २८ जून या दिवशी पालखी जिल्ह्यात प्रवेश करत आहे; मात्र प्रशासनाने संदिग्ध भूमिका घेतल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. लोणंद येथील काही प्रतिष्ठित नागरिकांनी नगरपंचायत प्रशासन, आपत्ती व्यस्थापन अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून पाळणे न उभारण्याची विनंती केली आहे; मात्र तरीही पाळणे उभारण्याचे काम चालूच आहे. याविषयी संताप व्यक्त करत ‘शासकीय यंत्रणांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी नागरिक करत आहेत.