सातारा, २७ जून (वार्ता.) – आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना वारीविषयी माहिती मिळणे आणि अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे यांसाठी ‘आषाढी वारी २०२२’ या ‘मोबाईल ॲप’ची निर्मिती करण्यात आली आहे.
ही सुविधा सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेषत: वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ‘मोबाईल ॲप’मध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गाचे वेळापत्रक, गावनिहाय नकाशा, श्रीक्षेत्र पंढरपूर येथील दर्शनाची व्यवस्था, पालखीचे विश्वस्त आणि पालखी सोहळाप्रमुखांचे संपर्क क्रमांक, वैद्यकीय सुविधांमध्ये सर्व आरोग्य अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, पाण्याची (मार्गावरील टँकर) सुविधा, अन्नपुरवठा आणि वितरणाविषयी, विद्युत् सेवा, तसेच पशूधनाविषयी संबंधित अधिकारी यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. पालखी सोहळ्याशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही संपर्क क्रमांक यात देण्यात आले आहेत. भाविकांनी गुगल प्लेस्टोरवरील https://play.google.com/store/apps/details?id=com.deectp.ashadhiwari या लिंकवरून ‘आषाढी वारी २०२२’ हे ॲप ‘डाऊनलोड’ करून घ्यावे. वारकऱ्यांनी या ॲपवरील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.