सोलापूर – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यांमध्ये आता ‘सीसीटीव्ही कॅमेरा’समवेत ‘ऑडिओ रेकॉर्डिंग’ची सुविधा चालू केली जाणार आहे. सोलापूर शहरातील ७ पोलीस ठाण्यांमध्ये तशी सोय करण्यात येत आहे. यामुळे पोलीस ठाण्यात अधिकारी आणि तक्रारदार, तसेच पोलीस अन् आरोपी यांच्यातील संवाद अन् घटनांची वस्तूस्थिती वरिष्ठांना पडताळता येणार आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आल्यानंतर ‘पोलिसांनी पैसे मागितले’, ‘अरेरावीची भाषा केली’, ‘व्यवस्थित वागणूक दिली नाही’, ‘पोलिसांनी मारहाण केली’, ‘पोलिसांनी तक्रार घेतलीच नाही’ किंवा ‘आम्ही म्हणतोय तशी तक्रार घेतली नाही’, असे आरोप अनेकदा केले जातात. त्याची चौकशी करतांना काहीच पुरावे नसल्याने ते आरोप खरे असले, तरीही वस्तूस्थिती समोर येत नाही. यावर उपाय म्हणून पोलीस ठाण्यांमध्ये ‘सीसीटीव्ही कॅमेरा’मध्ये ‘ऑडिओ रेकॉर्डिंग’ची सुविधा असणार आहे. त्यामुळे लाच घेणे किंवा पैशांची मागणी करणे हे प्रकार थांबतील, असा विश्वास वरिष्ठ अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. (लाच घेण्याचे प्रमाण थांबण्यासाठी पोलिसांच्या मनोवृत्तीत पालट होणे आवश्यक आहे. त्यामुळे लाचखोरी थांबवण्यासाठी वरवरची उपाययोजना नाही, तर समस्येच्या मुळाशी जाणारी उपाययोजना अपेक्षित आहे. – संपादक)