कोरोना संसर्ग, आषाढी वारीतील सुविधा, पेरण्या, आपत्ती व्यवस्थापन यांविषयी आढावा बैठक
मुंबई – आषाढी वारीमध्ये वारकरी भाविक देहभान हरपून सहभागी होत असतात. वारकर्यांना कोरोना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगा. त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची विनंती करा. विशेषतः मास्क वापरणे, वारीच्या मार्गावर स्वच्छता राखणे, शक्य तिथे शौचालयांची व्यवस्था करणे आणि आरोग्य सुविधा यांविषयी जाणीवपूर्वक काळजी घेण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, तसेच मंत्रालयातील विविध विभाग सचिवांच्या बैठकीत विविध कामांचा विस्तृत आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. कोरोना संसर्ग, पेरण्या, खतांची उपलब्धता, त्यासमवेत आपत्ती व्यवस्थापन सिद्धता, आषाढी वारीतील वारकर्यांच्या सुविधा यांविषयी महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी ‘पावसाची अनिश्चितता लक्षात घेऊन पेरण्या करण्याविषयी शेतकर्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे’, असे सांगितले. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजना यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. या वेळी विशेषतः कोकण विभागातील सिद्धता आणि सज्जता यांविषयी कोकण विभागीय आयुक्तांनी माहिती दिली. ‘जनतेशी संबंधित महत्त्वाची कामे थांबवून ठेवू नका, ती तातडीने माझ्याकडे घेऊन या’, असेही या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.