अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी आणि तस्करांसाठी भारत बनत आहे अनुकूल ठिकाण ! – अमेरिकेतील संशोधन संस्था

नवी देहली – अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी भारत तस्करांसाठी अनुकूल ठिकाण बनत असल्याचे समोर आले आहे. जगभरात अमली पदार्थांचा व्यापार अनुमाने ५० लाख कोटी रुपयांचा आहे. ‘सिनाओला’ नावाचे अमली पदार्थ तस्करी करणारे जगातील सर्वांत मोठे आस्थापन मेक्सिको देशातील आहे. मेक्सिको, तसेच लॅटिन अमेरिकेतील अन्य देश चीनहून कृत्रिम अमली पदार्थांची रसायने आयात करतात. भारतातही औषधांचा उद्योग वाढला आहे. त्यामुळे कृत्रिम अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी लागणारे रसायन भारतात सहजपणे उपलब्ध होते. चीनमध्ये ३२ रसायनांवर तेथील सरकारची कडक दृष्टी आहे. भारतात ही संख्या १९ आहे. गोळ्या आणि ‘कॅप्सूल’ बनवण्याच्या यंत्रांची भारतात नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. यामुळेच चीनमध्ये बेकायदेशीर व्यापार करणारे आणि मेक्सिकन व्यापारी संघ यांच्यासाठी भारत अनुकूल ठिकाण बनले आहे, असा दावा ‘बुकिंग्ज इन्स्टिट्यूशन’ या अमेरिकेतील संशोधन संस्थेच्या संचालिका वांडा फेलबाब ब्राऊन यांनी केला. अमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी यांच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय दिवसाच्या (‘इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड ॲलिसिट ट्रॅफिकिंग’च्या) निमित्ताने घेतलेल्या एका मुलाखतीत त्या बोलत होत्या.

ब्राऊन पुढे म्हणाल्या की, चीन जगातील सर्वांत मोठा औषधांची निर्मिती करणारा दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. चीनमध्ये ५ सहस्र मोठे, तर जवळपास ४ लाख मध्यम आणि छोटे कारखाने आहेत. त्यांपैकी अनेक कारखाने अनधिकृत आहेत. कोरोना काळापूर्वी ‘फेंटानिल’सारखे अमली पदार्थ थेट अमेरिकेला पाठवले जात होते. चीनमध्ये लोकांना ‘मेथ’ या अमली पदार्थाचे व्यसन जडू लागल्यावर, तसेच अमेरिकेचा दबाव वाढू लागल्यावर चीन सरकारने कारवाई केली. त्यानंतर या आस्थापनांनी त्यांचे कारखाने अमेरिकेऐवजी भारतात स्थलांतरित करणे चालू केले.

कृत्रिम अमली पदार्थ स्वस्त !

ब्राऊन म्हणाल्या की, सर्दी-पडसे यांच्या औषधांमध्ये वापरल्या जाणार्‍या रसायनांपासून ‘कोकेन’ आणि ‘हेरॉइन’ यांच्यापेक्षा धोकादायक; परंतु स्वस्त अमली पदार्थ बनवले जात आहेत. त्यास ‘सिंथेटिक ड्रग’ (कृत्रिम अमली पदार्थ) म्हटले जाते. ते लहान प्रयोगशाळांत सिद्ध केले जात आहे. ते बनवण्यासाठी शेतीचीही आवश्यकता नाही. कृत्रिम अमली पदार्थ अगदी पंजाब आणि हिमाचल प्रदेशपर्यंत पोचले आहेत.

असा चालतो अमली पदार्थांचा कोट्यवधी रुपयांचा व्यापार !

कोलंबिया देशात एक किलो कोकेन हा अमली पदार्थ बनवण्यासाठी प्रतिकिलो अनुमाने ८० रुपये, या मानाने ४०० किलो कोकोची पाने लागतात. हे सिद्ध करण्यासाठी ३२ सहस्र रुपये व्यय (खर्च) येतो. प्रत्यक्ष उत्पादक संघाकडून कोकेन ६५ सहस्र रुपयांत खरेदी केले जाते. अमेरिकेतील लास वेगासमध्ये ग्राहकाला हेच १ किलो कोकेन १ कोटी रुपयांत मिळते.

संपादकीय भूमिका

अमली पदार्थांचे तस्कर भारताला अमली पदार्थ निर्मितीचे माहेरघर बनवू पहात आहेत. हे गंभीर असून केंद्र सरकारने या विरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक !