हिंदु देवस्थान इनामी भूमी अपहार प्रकरणात जाणीवपूर्वक प्रशासकीय विलंब !

संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी

‘भ्रष्टाचार निर्मूलन समिती’चे कार्याध्यक्ष डॉ. गणेश ढवळे-लिंबागणेशकर

बीड – भूमाफियांनी स्थानिक राजकारणी, महसूल, प्रशासनातील अधिकारी आदींशी संगनमताने बनावट दस्तावेज सिद्ध करून जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांच्या इनामी भूमी बळकावल्या. त्यासंदर्भात वक्फ बोर्डाकडून काही प्रकरणांत गुन्हे नोंदवण्यात आले; परंतु हिंदु देवस्थान इनामी भूमींच्या अपहार प्रकरणात संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यास जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक विलंब करत आहेत. या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ‘भ्रष्टाचार निर्मूलन समिती’चे कार्याध्यक्ष डॉ. गणेश ढवळे-लिंबागणेशकर यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे केली.

१. डॉ. ढवळे-लिंबागणेशकर यांच्या तक्रारीवरून बीडच्या जिल्हाधिकार्‍यांनी उपजिल्हाधिकारी (सामान्य) भू-सुधार विभाग यांना बीड जिल्ह्यातील ‘हिंदु देवस्थान इनाम भूमी अपहार प्रकरणा’ची तात्काळ चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे.

२. डॉ. गणेश ढवळे-लिंबागणेशकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील दर्गा आणि मशीद ईनाम भूमी अपहार प्रकरणात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत; परंतु बीड तालुक्यातील नामलगाव येथील आशापूरक देवस्थान, पालवण येथील श्रीरामचंद्र देवस्थान, नेकनूर येथील गोसावी मठ, खापरपांगरी येथील श्रीरामचंद्र देवस्थान, बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रातील कालिंदेश्‍वर मंदिर यांसह अनेक देवस्थानांच्या ठिकाणी बनावट दस्तावेज सिद्ध करून बेकायदेशीर हस्तांतरण केल्याविषयी दोषींवर गुन्हे नोंदवण्यात यावेत. याविषयी वारंवार निवेदने देऊनही जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून का कारवाई करत नाही ? तसेच हिंदु देवस्थानांच्या इनामी भूमी अपहार प्रकरणी कारवाईस विलंब का केला जातो ? हे हिंदूंना कळले पाहिजे !