मोरोक्कोहून स्पेनमध्ये घुसखोरी करतांना झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू

मानवाधिकार संघटनांकडून चौकशीची मागणी

माद्रिद (स्पेन) – आफ्रिकेतील मोरोक्को देशातून पलायन करून स्पेनमध्ये प्रवेश करतांना सीमेवर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला, तर ७६ जण घायाळ झाले. ही घटना २४ जून या दिवशी घडली. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मानवाधिकार संघटनांकडून करण्यात येत आहे.

मोरोक्को सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, लोकांनी लोखंडी गजांवर चढण्याचा प्रयत्न केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. सीमेच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षारक्षकांचा कडेकोट बंदोबस्त असतांनाही १३३ स्थलांतरितांनी सीमा ओलांडली. या वेळी ५ जणांचा, तर रुग्णालयात १३ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे मोरक्कोच्या मानवाधिकार गटाने २७ लोक मारले गेल्याचे म्हटले आहे. गरिबी आणि हिंसाचार यांमुळे लोक मोरोक्कोमधून स्पेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी मार्चमध्ये मोरोक्कोच्या ३ सहस्र ५०० लोकांनी स्पेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अनुमाने १ सहस्र लोकांना यात यश आले होते.