सामाजिक माध्यमांवरून ‘अग्नीपथ योजने’च्या विरोधात अपसमज पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार ! – अजयकुमार बंसल, जिल्हा पोलीस अधीक्षक

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल

सातारा, २० जून (वार्ता.) – लोकांच्या भावना भडकवून हिंसाचाराच्या घटना घडतील अशा प्रकारचे संदेश कुणीही सामाजिक माध्यमांतून प्रसारित करू नयेत. ‘अग्नीपथ योजने’च्या विरोधात भडकावू संदेश किंवा भाष्य करून हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती, ग्रुप ॲडमिन आणि युवक यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

भारतीय सैन्य दलामध्ये युवकांना भरती होण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘अग्नीपथ योजना’ चालू करण्यात आली आहे. या योजनेला काही राज्यांमधून विरोध दर्शवला जात आहे. यामध्ये हिंसाचाराचेही प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात ‘अग्नीपथ योजने’च्या विरोधात आंदोलन आणि मोर्च्याचे नियोजन करण्यासाठी २० जून या दिवशी बैठकीचे आयोजन केले असल्याचे संदेश सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले जात आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिक, सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी सिद्धता करत असलेले युवक, करिअर अकॅडमीचे मालक आणि चालक यांना कळवण्यात येते की, सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या संदेशावर कुणीही विश्वास ठेवू नये, तसेच ते संदेश पुढे पाठवू नयेत.