सिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील परवानू येथे टिंबर ट्रेल रोपवेमध्ये अडकलेल्या ११ जणांची काही घंट्यांच्या प्रयत्नानंतर सुखरूप सुटका करण्यात आली. सोलन जिल्हा प्रशासन आणि टिंबर ट्रेलच्या तांत्रिक कर्मचार्यांनी लोकांना बाहेर काढले. एन्.डी्.आर्.एफ्.चे पथकही तेथे पोचले होते. परवानू जवळील टिंबर ट्रेलपासून ८०० मीटर अंतरावर एका टेकडीवर एक हॉटेल आहे. रोपवेने लोक हॉटेलपर्यंत जातात. २० जूनला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ट्रॉलीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ट्रॉली मध्येच दोरखंडांवरच थांबली. त्यानंतर त्यांतील ७ जणांना दोरीच्या साहाय्याने खाली उतरवण्यात आले. उर्वरितांना सैन्याच्या साहाय्याने खाली उतरवण्यात आले. यात वृद्धांचा समावेश होता. यापूर्वी १३ ऑक्टोबर १९९२ या दिवशी याच प्रकारे टिंबर ट्रेलमध्ये ११ पर्यटक अडकले होते.