वारी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरूप होणारी भक्तीची गंगा !

आज २० जून या दिवशी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहू (पुणे) येथून होत असलेल्या प्रस्थानाच्या निमित्ताने…

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ।
माझियां सकलां हरिच्या दासा ।।

कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ।
ही संत मंडळी सुखी असो ।।

अहंकाराचा वारा न लागो राजसा ।
माझिया विष्णुदासा भाविकांसी ।।

नामा म्हणे तया असावे कल्याण ।
ज्या मुखी निधान पांडुरंग ।।
– संत नामदेव महाराज

ही प्रार्थना पायी जाणारे नित्यनेमाचे वारकरी, संत आणि महाराज यांच्यासाठी केली जाते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचे वैभव आहे. नदी सागराला मिळते आणि सागररूप होऊन जाते, तशीच ही विठ्ठलरूप भक्तीची गंगा पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरूप होते, तीच वारीच्या स्वरूपातील पालखी होय.

माझे जीवाची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।
पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ।।
– संत ज्ञानेश्वर महाराज

या आर्त ओढीने वारकरी पांडुरंगाची भेट घेतात. अद्वैत आनंदाची अनुभूती हा सुखाचा अविष्कार आहे, तसाच तो एकात्मतेचा विराट लोकप्रवाह आहे.

१. वारीचे स्वरूप

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुण्यस्पर्शाने आणि संजीवन समाधीच्या स्थानाने पवित्र झालेल्या तीर्थक्षेत्र आळंदी या पवित्र स्थानातून प्रतिवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी मोठ्या श्रद्धेने वारीला पायी जातात.

श्रीक्षेत्र देहूगाव येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सासवड येथून सोपानकाका आणि त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथ यांच्या, तसेच अन्य अनेक पालख्या निघतात. या सर्व पालख्यांमधील श्रेष्ठतेचा सन्मान असलेला, महाराष्ट्र, भारत आणि जगात एकमेव असलेला माऊलींचा पालखी सोहळा, म्हणजे एक सांस्कृतिक आश्चर्य आहे. वारकरी, फडकरी, दिंडीकरी, ग्रामस्थ-शहरवासी, शेतकरी-कामकरी, गरीब-श्रीमंत, नोकरदार-व्यापारी, लहान-थोर स्त्री-पुरुष आणि तरुण-वृद्ध इत्यादी यात मोठ्या भाविकतेने सहभागी होतात. माऊलीच्या समवेतचा प्रवास ऊन-वारा, पाऊस-पाणी, सोयी-गैरसोयी, यांचा विचार न करता टाळ-मृदंगाच्या साथीने भगवी पताका खांद्यावर घेऊन मुखाने भजन, अभंग आणि हरिपाठ म्हणत, गात भक्तीरसात न्हाऊन कशाची काळजी न करता आनंद देत-घेत वारी करतात. हे वारकरी २५० कि.मी. मार्गक्रमण करत २० हून अधिक दिवस वारी करतात.

२. श्री गुरहैबत बाबा

पालखी सोहळ्यास ज्यांनी आरंभ केला, ते ‘श्री गुरहैबत बाबा’, हे मूळचे सातारा जिल्ह्यातील आरफळ या गावचे ! त्यांचे घराणे तसे शूर वृत्तीचे आणि धार्मिक होते. त्यांनी माता-पित्यांच्या समवेत पंढरीची वारी केली होती; मात्र पंढरीनाथापेक्षा त्यांचे मन श्री ज्ञानदेवांच्या चरणी अधिक रमले आणि त्यातून पालखी सोहळ्याचा प्रारंभ झाला.

३. पायी वारीची फलश्रुति

अ. वारीमुळे प्रारब्धप्राप्त कर्माचरण करतांना उद्भवणाऱ्या सुख-दुःखाच्या प्रसंगी मन स्थिर रहाण्याची शक्ती मिळते. दैनंदिन व्यवहार काटकसरीने करण्याची सवय लागते. अनेक प्रकारची व्यसने न्यून होत जातात.

आ. वारीच्या दरम्यान भेटणारे वारकरी, संतसंगत, भजन, कीर्तन आणि प्रवचन यांमुळे आपले आचार अन् विचार यांत परिवर्तन होते.

इ. सृृष्टीमधील चराचरात आणि कणाकणात वास करणाऱ्या परमेश्वराच्या भक्तीचे महत्त्व कळते. सात्त्विक संबंध वाढतात. प्रेमभाव जागृत होतो. मानवजातीची सुख-दुःखे कळून समाजसेवा करण्याची वृत्ती वाढीस लागते आणि त्यामुळे ईश्वरसेवा घडते.

ई. भौतिक आणि व्यावहारिक जीवन जगतांना वासना अन् विकार नष्ट होण्यास साहाय्य होते.’

(साभार : साप्ताहिक ‘श्रीधर संदेश’)