आईसलँड जगातील सर्वाधिक शांत देश, तर अफगाणिस्तान सर्वाधिक अशांत देश !

‘ग्लोबल पीस इंडेक्स-२०२२’चा वार्षिक अहवाल  

भारत १३५ व्या क्रमांकावर !

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – ‘ग्लोबल पीस इंडेक्स-२०२२ ’च्या (विश्‍व शांती सूचकांक-२०२२ च्या ) अहवालानुसार आईसलँड जगातील सर्वांत शांत असलेला देश ठरला आहे, तर अफगाणिस्तान सर्वाधिक अशांत देश ठरला आहे. या सूचकांकामध्ये शांततेच्या संदर्भात भारत १३५ व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी तो १३८ व्या क्रमांकावर होता.

१. वर्ष २००८ पासून प्रारंभ झालेल्या या सूचकांकामध्ये गेल्या १५ वर्षांपासून आईसलँड शांततेच्या संदर्भात पहिल्या क्रमांकावर कायम आहे. यावर्षी न्यूझीलँड दुसर्‍या क्रमांकावर आहे. आर्यलँड तिसर्‍या, तर डेन्मार्क चौथ्या स्थानावर आहे. अशांत देशांमध्ये येमेन दुसर्‍या, तर सीरिया तिर्‍या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे रशिया चौथ्या क्रमांकावर आहे.

२. युरोप जगातील सर्वांत शांतता असलेला प्रदेश ठरला आहे. युरोपमील ८ देश शांततेमध्ये वरच्या १० क्रमांकांमध्ये आहेत.

असे होते मूल्यांकन !

विश्‍व शांती सूचकांकाला ‘इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस’कडून सिद्ध केले जाते. यात देश, क्षेत्र यांच्या शांतीचा स्तराची स्थिती यांनुसार त्यांना अंक दिले जातात. अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष, सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, सैन्य आदी २३ मापदंडांद्वारे त्यांचे मूल्यांकन केले जाते.

संपादकीय भूमिका

यातून भारतामध्ये अशांतता आहे, हे लक्षात येते ! भारत धर्मनिरपेक्ष आणि म. गांधी यांचा देश असूनही देशात अशांतता आहे, हे लक्षात घ्या ! भारताला शांततापूर्ण देश बनवण्यासाठी भारताला ‘धर्माधिष्ठित देश’ करण्याची आवश्यकता आहे. अशा देशातील जनता धर्माचरणी असेल आणि त्यामुळे आपसूकच शांतता निर्माण होईल !