मुले ही देशाची संपत्ती आहे. त्यांना घडवण्यामध्ये शिक्षकांसमवेत आई-वडिलांचा वाटा मोठा आहे. पालक जेवढे मुलांना वेळ देऊन चांगल्यारितीने घडवू शकतात, तेवढे अन्य कुणीही घडवू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. सध्या आई स्वत:च्या ‘करिअर’च्या मागे लागल्यामुळे मुलांकडे लक्ष देण्यासाठी तिच्याकडे वेळ नाही. परिणामी पालकांचे मुलांकडे लक्ष नाही, अशी स्थिती आहे. मुलांना घडवणे हे स्वत: मुले, कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एक मुलगा कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांची संपत्ती आहे. त्यांना चांगल्याप्रकारे घडवणे, हे पालक आणि शिक्षक यांचे दायित्व आहे. यामध्ये किमान पुढील गोष्टी करू शकतो.
१. लहानपणापासून मुलांना वेळ द्या.
२. मुलांशी मनमोकळेपणाने गप्पा मारा. त्यांचा एकेक विचार समजून घ्या. त्यातील अयोग्य विचारांना शांतपणे आणि संयमाने उत्तर द्या.
३. त्यांची मानसिकता समजून घेऊन त्यांना योग्य पद्धतीने विचार करण्याची सवय लावा.
४. मुलांना केवळ शालेय अभ्यास करण्याच्या मागे न लागता त्यांच्यामध्ये अनेक गुणांचा विकास कसा होईल ? यासाठी प्रयत्न करा. यासाठी लहानपणापासूनच मुलाच्या कुवतीप्रमाणे त्याला बैठे, तसेच मैदानातील वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायला प्रोत्साहन देणे, चित्रे काढणे, सर्वांमध्ये मिसळणे, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणे यांसाठी प्रोत्साहन द्यायला हवे.
५. वयात आलेल्या मुला-मुलींना या काळात शरीर आणि मन यांमध्ये होणारे पालट समजावून सांगावेत. जेणेकरून मुला-मुलींमधील आकर्षणाच्या आहारी न जाता, त्याकडे कशा पद्धतीने पहायचे ? हे मुलांना शिकता येईल.
६. विविध प्रकारच्या विषयांची पुस्तके वाचण्यासाठी शिकवावे. पुस्तके वाचल्याने ज्ञानात भर पडते. कोणत्या प्रसंगात कसा विचार करायला हवा ? इतरांशी कसे बोलायला हवे ? कसे वागायला हवे ? हे सर्व आपोआप शिकता येते.
७. मुले दूरचित्रवाणी संचावरील कोणते कार्यक्रम पहातात ? याकडे लक्ष ठेवावे. त्यांनी कोणते कार्यक्रम आणि किती वेळ पहायला हवेत ? हे समजावून सांगावे.
८. मुलांकडून कितीही चुका झाल्या तरी त्यांना प्रोत्साहन देणे आणि प्रेरणादायी ठेवणे यांकडे लक्ष द्यायला हवे.
९. कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ द्यायचा ? याचे नियोजन करून द्या.
वेळीच मुलांना योग्य पद्धतीने घडवल्यास त्यांना जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगाला सामोरे जाता येते. हे लक्षात घेऊन पालकांनी मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ द्यायला हवा, हे नक्की !
– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, सनातन आश्रम, पनवेल. (१५.६.२०२२)