अभ्यास आणि साधना या दोघांमध्येही यश मिळवणाऱ्या सनातनच्या युवा साधिका आधुनिक वैद्या (कु.) श्रिया साहा !

बंगाल येथील दैवी युवा साधिका आणि आधुनिक वैद्या (कु.) श्रिया साहा यांनी अभ्यास अन् साधनेचे प्रयत्न दोन्ही एकत्रित केले. त्यांनी त्वचारोगतज्ञाचे (एम्.डी. डर्मिटॉलॉजी) शिक्षण घेतले असून साधनेत प्रगती करून ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. त्यांनी त्यांचा जीवनप्रवास ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या एका चलचित्रात सांगितला असून त्याच्या संपादित भागाचा हा लेख आहे. यातून दैवी बालकांचा लहानपणापासूनचा प्रवास, त्यांचे आचरण, साधना आणि अभ्यास यांची सांगड घालणे, त्यांचे प्रगल्भ विचार लक्षात येतात.

आधुनिक वैद्या (कु.) श्रिया साहा

१. लहानपणापासून शांत प्रकृती

लहानपणापासून इतरांमध्ये मिळून मिसळून रहाण्याचा भाग होता. कुणाशी कधी भांडण किंवा चिडचिड नाही. केवळ अभ्यास एके अभ्यास न करता शिक्षणासमवेत मी विविध छंदही जोपासले. घरातील कामे करणे, आई-वडिलांना साहाय्य करणे केले. वडिलांची सरकारी नोकरी असल्याने त्यांची काही वर्षांनी नवीन ठिकाणी बदली व्हायची. तेव्हा तेथे नवीन मित्रमैत्रिणी असल्या, तरी त्यांच्याशी जुळवून घेतांना कधी अडचण आली नाही. लहानपणापासून अनावश्यक बोलणे, इतरांची निंदा करणे केले नाही.

२. आई-वडिलांकडून शिस्तपालनाचे धडे मिळणे

पूर्वीपासून बाहेरील खाणे, दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम अधिक पहाणे, बाहेर अधिक प्रमाणात फिरायला जाणे टाळायचे. मांसाहार केल्यावर मला डोके आणि शरीर जड होणे अशा स्वरूपाचे त्रास व्हायचे. त्यामुळे मांसाहार करणे बंद झाले. दूरचित्रवाहिनी संचावरील कार्यक्रम पहाणे नंतर पूर्णपणे बंद होऊन तो केवळ शोभेची वस्तू म्हणून राहिला.

३. परीक्षांचा ताण न घेणे

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळी घरातील वातावरण सामान्य असल्याने आणि आई-वडिलांच्या विशेष अपेक्षा नसल्याने कोणत्याही परीक्षांचा ताण आला नाही. कधी परीक्षा असायच्या आणि पेपर देऊन उत्तीर्ण व्हायचो, हेसुद्धा घरात माहिती नव्हते. माझा पदवी परीक्षेत शेवटच्या वर्षाला वर्गात प्रथम क्रमांक आला, तसेच नीट परीक्षेसारख्या स्पर्धात्मक परीक्षेतही चांगले गुण मिळून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला, ही प.पू. गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा आहे.

४. ‘देवाकडे काही मागू नये’, असे वाटणे

माझे मित्र आणि मैत्रिणी मंदिरात गेल्यावर अथवा देवाजवळ प्रार्थना करतांना ‘मला अधिक गुण मिळू दे’, ‘चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होता येऊ दे’, अशी प्रार्थना करायचे. मला देवाला अशी प्रार्थना कधी करावीशी वाटली नाही. देव जे काही देईल, ते माझ्यासाठी चांगलेच असणार आहे. ‘मी काहीतरी मागून देवाच्या नियोजनात अडथळे आणत आहे’, असे मला वाटायचे. मिळेल त्यात समाधानी रहाण्याची वृत्ती पूर्वीपासून होती.

५. महाविद्यालयीन वातावरणाचा परिणाम होऊ न देणे

मी महाविद्यालयातही शांत प्रकृतीची होते. महाविद्यालयात मित्र आणि मैत्रिणींच्या समवेत असतांना ते केव्हा माझ्याशी बोलणे टाळायचे किंवा मला त्यांच्यात सहभागी करून घ्यायचे नाहीत. तेव्हा मी श्रीकृष्णाला प्रार्थना करायचे. तेव्हा मला लक्षात यायचे, ‘श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्याविना दुसरा कुठलाही आधार नाही.’ त्यामुळे मायेचे आकर्षण हळूहळू अल्प झाले आणि देवाची ओढ वाढली.

महाविद्यालयीन जीवनातील सर्वच दिवस चांगले होते असे नाही. अनेक चढ-उतारसुद्धा आले; मात्र देवाच्या साहाय्याने मला त्यातून बाहेर पडता आले.

६. अनावश्यक कपडे आणि साहित्य विकत न घेणे

आई-वडील बाजारात घेऊन गेल्यावर तेथे कपडे, अन्य साहित्य विकत घेण्यासाठी मी त्यांच्याकडे हट्ट केला नाही. ते मला ‘हे हवे का ?, ते हवे का ?’, असे विचारायचे; मात्र ‘माझ्याजवळ वस्तू, कपडे आणि अन्य साहित्य आधीच आहे’, असे मला वाटून मी बाजारातून वस्तू घेण्यास टाळत असे. माझ्याजवळचे हस्तकलेचे साहित्य मी जपून ठेवून कुणाला काही भेटवस्तू द्यायची असल्यास त्या उपलब्ध वस्तूंमधूनच कलाकृती बनवून देत असे. काटकसरीने रहाण्याची सवय आधीपासूनच लागली होती. माझ्या जवळील सर्वच वस्तू मी सांभाळून ठेवल्या.

७. प्रत्येक कृतीतून आनंद मिळवणे

जी कृती मी करणार, ती चांगली असावी, यासाठी प्रयत्न करत होते. त्यामध्ये लिखाण करतांना दोन शब्दांमध्ये योग्य तेवढे अंतर ठेवणे, ओळ्या आखतांना त्या नीट आखणे, भाजी चिरतांना एकाच आकाराचे तुकडे करणे, सात्त्विक कपडे परिधान करणे अशा कृती सहजतेने जमायच्या. संगणकीय प्रणाली वापरून कलाकृती बनवणे इत्यादी नवीन कौशल्यपूर्ण कामे करण्याची आवड होती.

८. साधना आणि सेवा यांचे प्रयत्न वाढवल्यावर आनंदात वाढ होणे आणि आध्यात्मिक प्रगती होणे

आई-वडिलांकडून साधना समजल्यावर मी नामजपासह सेवेत सहभाग वाढवल्यावर मला ‘माझ्या आनंदात वाढ होत आहे’, असे जाणवले. मी सेवेसाठी आणखी वेळ दिल्यावर आनंदात अधिक वाढ झाली आणि त्याच कालावधीत माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले.

– आधुनिक वैद्या (कु.) श्रिया साहा (एम्.डी.), बंगाल