‘फबिंग’ या मनोविकृतीला भाग्यनगर येथील ५० टक्के विद्यार्थी पडले बळी !

(‘फबिंग’ म्हणजे तुमच्यासमवेत लोक असतांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वत:च्या भ्रमणभाषमध्येच मग्न रहाण्याची मनोविकृती !)

भाग्यनगर – ‘फबिंग’ ही मनोवृत्ती सध्या सर्वत्र बळावत असल्याचे दिसत आहे. तेलंगाणाची राजधानी भाग्यनगर येथील ५० टक्के युवावर्ग हा यास बळी पडल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला आदी क्षेत्रांत अभ्यास करणारे ४३० विद्यार्थी सहभागी झाले होते. हे सर्वेक्षण वर्ष २०१८ मध्ये करण्यात आले असून ते आता सादर करण्यात आले. (गेल्या साधारण सव्वादोन वर्षांत म्हणजे दळणवळण बंदीच्या काळामध्ये तर भ्रमणभाषचा वापर अनेक पटींनी वाढला. त्यामुळे त्याचे दुष्परिणामही तितक्याच पटींनी वाढले असणार, हे निश्‍चित आहे ! – संपादक)

‘भाग्यनगरमधील युवावर्गात मानसिक त्रासांच्या रूपातील ‘फबिंग’चे परिणाम’ या नावाने प्रकाशित सर्वेक्षणाच्या सहलेखिका डॉ. सुधा बाला यांचे म्हणणे आहे की, ही मनोवृत्ती युवावर्गात पुष्कळ प्रमाणात बळावली असून त्यांचे जीवन, तसेच मित्र अन् कुटुंब यांच्याशी त्यांचे असलेले संबंध यांवर नकारात्मक परिणाम करत आहे. हा प्रकार अनेक प्रौढ लोकांमध्येही दिसून येतो.

संपादकीय भूमिका

विज्ञानाने मानवाला अनेक सोयी-सुविधा तर दिल्या; परंतु हे विज्ञान मानवाचा एकांगी विकास साधत असल्याने ‘सुविधांचा वापर किती करावा’, ‘त्यांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो’, याचा विवेक मानवामध्ये राहिला नाही. यातून मानवनिर्मित विज्ञानाचे अपयश आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ करणार्‍या अध्यात्माचे महत्त्व लक्षात येते !