पाकिस्तानी आतंकवादी अब्दुल रहमान मक्की याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला चीनचा खोडा

पाकिस्तानी आतंकवादी अब्दुल रहमान मक्की

संयुक्त राष्ट्रे – पाकिस्तानी आतंकवादी अब्दुल रहमान मक्की याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत खोडा घातला. भारत आणि अमेरिका यांनी संयुक्तपणे हा प्रस्ताव मांडला होता.

मक्की हा मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार हाफीज सईद याचा साला आहे. यापूर्वीही चीनने अनेकदा अशा प्रकारचा खोडा घातला आहे. पाकस्थित जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्याच्या भारताला प्रयत्नांना वर्ष २०१९ मध्ये जवळपास १० वर्षांनंतर यश लाभले होते. त्यालाही तेव्हा चीनने विरोध केला होता.

अमेरिका, ब्रिटन, चीन, फ्रान्स आणि रशिया हे ५ देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत. त्यांच्याकडे ‘वीटो’ अधिकार आहेत, म्हणजे या देशांपैकी एका देशाने जरी कुठल्या प्रस्तावच्या विरोधात मतदान केले, तर तो प्रस्तावच बारगळतो. (हा नियमच पालटण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांवर दबाव आणून चीनला दणका दिला पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

आतंकवाद्यांचे उघड उघड समर्थन करणार्‍या चीनला आता जगातील सर्व देशांनी संघटित होऊन एकाकी पाडले पाहिजे !