सूर्यफुलाच्या लागवडीची ठळक वैशिष्ट्ये !

मोसमी पावसाला प्रारंभ झाल्यानंतर सूर्यफुलाची लागवड केली जाते. ती लागवड कशा प्रकारे करावी ? तसेच सूर्यफुलाविषयी विद्यापिठाने शिफारस केलेल्या जाती, पेरणीची वेळ, पेरणीची पद्धत, आंतरपीक आणि खते इत्यादींची माहिती येथे देत आहोत.

१. हवामान

सूर्यफुलास थंड आणि कोरडी हवा चांगली मानवते. हे पीक मध्यम ते कमी पावसाच्या भूप्रदेशामध्ये चांगले येते. या पिकास जास्त पाऊस सहन होत नाही. त्यामुळे जास्त पावसाच्या भूप्रदेशामध्ये हे पीक घेऊ नये.

२. भूमी

सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी भूमी निवडावी. आम्लयुक्त आणि पाणथळ भूमीत हे पीक चांगले येत नाही.

३. पूर्वमशागत

भूमीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे. गोमय उपलब्ध असल्यास त्याचाही उपयोग करू शकतो.

४. कृषी विद्यापिठाने शिफारस केलेल्या जाती (वाण) !

५. पेरणीची वेळ

पाण्याची उपलब्धता असल्यास हे पीक तीनही हंगामांमध्ये घेता येते. खरीप हंगामात १५ जून ते १५ जुलैपर्यंत पेरणी करावी. रब्बी हंगामात (हिवाळी) सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत आणि उन्हाळी हंगामात जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पेरणी पूर्ण करून घ्यावी.

डॉ. निवृत्ती चव्हाण

६. पेरणीचे अंतर

मध्यम ते खोल भूमी ४५x३० सें.मी., भारी भूमी ६०x३० सें.मी., तसेच संकरित वाण आणि जास्त कालावधीच्या वाणासाठी ६०x३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी.

७. पेरणी पद्धत

कोरडवाहू सूर्यफुलाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी, म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. बी ५ सें.मी.पेक्षा जास्त खोल पेरू नये. बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकण पट्टीने करावी. एका ठिकाणी दोन बी टोकावे आणि दोन आठवड्याने विरळणी करून एका जागी एकच जोमदार रोप ठेवावे.

८. बियाणे

सुधारित वाणासाठी ७ ते ८ किलो आणि संकरित वाणासाठी ५ ते ६ किलो बियाणे प्रती हेक्टरी वापरावे.

९. बीजप्रक्रिया

मर रोगाच्या प्रतिबंधासाठी २ ते २.५ ग्रॅम थायरम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर ‘ॲझोटोबॅक्टर’ हे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे.

१०. आंतरपीक

आंतरपीक पद्धतीत सूर्यफूल + तूर (२:१ किंवा २:२) या प्रमाणात ओळीने पेरणी केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.

११. खते

कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी २.५ टन शेणखत वा कंपोस्ट, तसेच ५० किलो नत्र (नायट्रोजन), २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे. बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे. यांपैकी निम्मे नत्र आणि संपूर्ण स्फुरद अन् पालाश पेरणीच्या वेळी द्यावे अन् उरलेला ३० किलो नत्र पेरणीनंतर एक मासांनी द्यावा. भूमीत गंधकाची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतातून द्यावे.

१२. आंतरमशागत

पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच जोमदार रोप ठेवावे. पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी करावी, तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर २० दिवसांनी आणि दुसरी ३५ ते ४० दिवसांनी करावी.

१३. पाणी व्यवस्थापन

सूर्यफुलाच्या पिकास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे.

सूर्यफुलाच्या संवेदनक्षम अवस्था –

१. रोप अवस्था,
२. फूलकळी अवस्था,
३. फुलोऱ्याची अवस्था,
४. दाणे भरण्याची अवस्था.

या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. फूलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ रहातात आणि उत्पादनात घट येते.

१४. पीक संरक्षण

किडींचा बंदोबस्त करण्यासाठी २ ग्रॅम ‘क्लोरापायरीफॉस’ प्रती लिटर पाणी या प्रमाणात मिसळून आवश्यकतेनुसार २ वेळा फवारणी करावी.

१५. जैविक कीड नियंत्रण

सूर्यफुलावरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, घाटी अळी इ. किडींच्या नियंत्रणासाठी एच्.एन्.पी.व्ही. या विषाणूची फवारणी करावी.

१६. काढणी

सूर्यफुलाची पाने, देठ आणि फुलाची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर आणि दाणे पूर्ण भरून घट्ट (टणक) झाल्यानंतर पिकाची कापणी करावी. कणसे (फुले) चांगली वाळवून नंतर मळणी करावी.

१७. सरासरी उत्पादन

कोरडवाहू – ८ ते १० क्विंटल प्रती हेक्टरी
संकरित वाण – १२ ते १५ क्विंटल प्रती हेक्टरी

१८. विशेष भाग

अ. पीक फुलोऱ्यात असतांना सकाळी ७ ते ११ या वेळेत हाताला तलम किंवा सुती कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरून हळूवार हात फिरवावा म्हणजे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.

आ. सूर्यफूल उमलण्याच्या अवस्थेत आणि त्यानंतर ८ दिवसांनी २ ग्रॅम बोरॅक्स प्रती लिटर पाणी याप्रमाणात मिसळून फवारणी करावी, म्हणजे दाणे चांगले भरून उत्पादनात वाढ होते.

इ. सूर्यफूल फुलोऱ्यात असतांना मधमाश्यांच्या माध्यमातून परागीभवन होण्यास साहाय्य होत असल्यामुळे या काळात कीटकनाशकाची फवारणी करू नये.

ई. सूर्यफुलाची मुळे भूमीत खोल जातात आणि वारंवार हे पीक घेतल्यास जमिनीचा पोत बिघडून उत्पादन क्षमता अल्प होते; म्हणून न्यूनतम ३ वर्षे तरी त्याच भूमीत सूर्यफुलाचे पीक घेऊ नये.

संकलक : डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), एम्.एस्सी. (ॲग्रिकल्चर), पीएच्.डी., रामनाथी, गोवा.