कतारकडून भारतीय कामगारांच्या अधिकारांचे घोर उल्लंघन ! – भारतीय मजदूर संघ

वर्ष २०१४ मध्ये १ सहस्र ६११ भारतीय कामगारांचा कतारमध्ये मृत्यू !

नवी देहली – रा.स्व. संघाची कामगारांची शाखा असलेल्या ‘भारतीय मजदूर संघा’ने भारतातून कतारमध्ये काम करायला गेलेल्या कामगारांच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकला आहे. ‘कतारमध्ये भारतीय कामगारांशी गुलामांसारखा व्यवहार केला जातो. हे त्यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन असून कतारने यावर उपाय काढला नाही, तर या विरोधात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आंदोलन छेडण्यात येईल’, असे भारतीय मजदूर संघाचे बिनॉयकुमार सिन्हा यांनी म्हटले.

सिन्हा पुढे म्हणाले की, वर्ष २०१४ मध्ये कतारमध्ये १ सहस्र ६११ भारतीय प्रवासी कामगारांचा मृत्यू झाला होता. कामगारांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोचवण्यासही दिरंगाई केली जाते, असा आरोपही त्यांनी केला.

अशा प्रकारे केले जाते भारतीय कामगारांचे मानसिक खच्चीकरण !

कतारमध्ये भारतासमवेत दक्षिण आशियाई देशांतील सहस्रावधी लोक मजुरीची कामे करतात. ‘कामगारांचे पासपोर्ट जप्त करणे’, ‘अधिक घंटे काम करण्यास बाध्य करणे’, ‘गलिच्छ स्थितीतील निवास’, ‘लैंगिक शोषण’, ‘कौशल्य नसलेले काम करण्यास बाध्य करणे’ यांसारखे मानसिक खच्चीकरण केले जात आहे.

संपादकीय भूमिका

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून भारताने ‘मुसलमानांची क्षमा मागावी’, अशी मागणी करणार्‍या कतारला आता भारतानेच जाब विचारला पाहिजे !