विहिंप आणि बजरंग दल १६ जून ला देशभरात हिंसाचारी जिहाद्यांच्या विरोधात आंदोलन करणार

नवी देहली – विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल १६ जून या दिवशी देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांच्या विरोधात निदर्शने करणार आहेत. याविषयी विहिंपने प्रसिद्धीपत्रक प्रसारित करून म्हटले आहे की, देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आंदोलन करून राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे.

१. विहिंपचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी सांगितले की, भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात पैगंबर यांच्याविषयी मांडलेल्या सूत्रावरून जिहादी देशभरात हिंसाचार करत आहेत. याविरोधात आम्ही आंदोलन करणार आहेत. यासह १० जून या दिवशी ज्या मशिदी आणि मदरसे यांतून नमाजानंतर मुसलमान बाहेर पाडले अन् हिंसाचार केला, त्या मशिदी आणि मदरसे यांवर आम्ही लक्ष ठेवणार आहोत. हिंसाचार करणार्‍या संघटनांवरही कारवाई केली पाहिजे. भारताची अपकीर्ती करण्यासाठी जिहादी शक्ती संघटित होत असून त्यांचा सामना करण्यासाठी हिंदूंनाही संघटित व्हावे लागेल.

२. विहिंपचे देहली प्रमुख कपिल खन्ना यांनी देहलीतील हिंदूंना आवाहन करतांना म्हटले की, प्रत्येक हिंदूने प्रत्येक मंगळवारी मंदिरांमध्ये सामूहिक हनुमान चालिसाचे पठण चालू केले पाहिजे, तरच शुक्रवारी केल्या जाणार्‍या दगडफेकीवर लगाम घालता येईल.