रत्नागिरी येथील एम्.आय.डी.सी. क्षेत्र व्यवस्थापक हरिश्चंद्र वेंगुर्लेकर सेवानिवृत्त

निरोप समारंभाच्या वेळी अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव !

डावीकडून श्री. शुक्राचार्य म्हाडेश्‍वर, श्री. हरिश्‍चंद्र वेंगुर्लेकर यांचा सत्कार करतांना माजी मंत्री सुरेश प्रभु, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन्. पाटील आणि श्री. राजू सावंत

रत्नागिरी, १२ जून (वार्ता.) – औद्योगिक क्षेत्रात ३३ वर्षे प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्त झालेले ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’चे (‘एम्.आय.डी.सी.’चे) क्षेत्र व्यवस्थापक श्री. हरिश्‍चंद्र वेंगुर्लेकर यांचा ३१ मे २०२२ या दिवशी रत्नागिरी येथे निरोप समारंभाच्या निमित्ताने जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि अधिकारीवर्ग यांनी श्री. वेंगुर्लेकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी येथे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडाळकर यांनी श्री. वेंगुर्लेकर यांचा सत्कार केला.

या निरोप समारंभाच्या वेळी श्री. वेंगुर्लेकर यांचे कुटुंबीय सदस्य, मित्रपरिवार, कॅप्टन दिलीप भाटकर, ‘रत्नागिरी इंडस्ट्रिज असोसिएशन’चे अध्यक्ष दिगंबर मगदूम, ‘कुडाळ एम्.आय.डी.सी. इंडस्ट्रिज असोसिएशन’चे अध्यक्ष आनंद बांदिवडेकर, चिपळूणचे उद्योजक गजानन कदम, रत्नागिरीचे उद्योजक राजू सावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, कुडाळ येथील उद्योजक मोहन होडावडेकर, कमलाकर परब, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि उद्योजक श्री. अनील देवळे आणि अन्य उद्योजक या वेळी उपस्थित होते .

७ जून २०२२ या दिवशी माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेश प्रभु हे रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावर आले असतांना त्यांनी श्री. वेंगुर्लेकर यांना रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून त्यांचा सत्कार केला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन्. पाटील उपस्थित होते. कुडाळ औद्योगिक संघटनेकडूनही श्री. वेंगुर्लेकर यांचा सत्कार करण्यात आला.

कायद्याच्या चौकटीत बसून कार्य करायचे, हे वेंगुर्लेकरांचे वैशिष्ट्य होय !- प्रशांत पटवर्धन, लोटे इंडेस्ट्रियलचे अध्यक्ष अन् उद्योजक

२ वर्षापूर्वी एल्.जी.च्या एका प्लान्टचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी आले होते. त्या वेळी त्यांनी ‘औद्योगिक विकास महामंडळामुळेच महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती झाली, असे सांगून कौतुक केले होते. निरपेक्ष हेतूने करणारी अनेक माणसे आहेत. ज्यांनी उद्योजगाला चालना दिली आहे. कुडाळ आणि रत्नागिरी प्रादेशिक कार्यालयात काम करणारे सर्व कर्मचारी निष्ठेने आणि प्रेमाने उद्योगांच्या विकासासाठी झटत राहिले. याचाच एक भाग श्री. वेंगुर्लेकर आहेत. वेंगुर्लेकर यांच्या कार्यामागे अभ्यासूवृत्ती आणि सखोल ज्ञान आहे. परिपत्रक आल्यानंतर ते पूर्ण वाचून कायद्याच्या चौकटीत बसून कार्य करायचे, हे त्यांचे वैशिष्ट्य होय.

‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।’ प्रमाणे वेंगुर्लेकर यांचे कार्य ! – प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर

वेंगुर्लेकर सर्व कार्यालयाचे आधार आहेत. गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।’ (तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्यांच्या फळाविषयी कधीही नाही.) याप्रमाणे त्यांचे कार्य आहे. पारदर्शक कारभार, स्पष्टवक्तेपणा, तत्परता हे त्यांचे प्रमुख गुण आहेत. त्यांची कार्यपद्धत सर्वांनाच प्रेरणादायी होती. त्यांनी केलेल्या सूचनांचे आम्ही कायम स्वागतच केले आहे. त्यांचा अनुभवाचा लाभ आपणा सर्वांनी घ्यायला हवा.

श्री. हरिश्‍चंद्र वेंगुर्लेकर

आजचा झालेला सन्मान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण ! – हरिश्‍चंद्र वेंगुर्लेकर

सत्काराला उत्तर देतांना श्री. वेंगुर्लेकर म्हणाले, ‘‘निरोप समारंभात मी लावत असलेल्या टिळ्याचा अनेकांनी उल्लेख केला. मी धर्माचरण म्हणून टिळा लावतो. साधना म्हणून कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर सनातन संस्थेच्या माध्यमातून सेवा करतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मार्गदर्शनातून सांगितले होते की, तुम्ही ज्या ठिकाणी रहात असाल, त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करा. तेथेच रामराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करा. स्वत:मध्ये रामराज्य निर्माण झाले, तर जगातही रामराज्य येईल. आज झालेला सन्मान हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करतो. रत्नागिरी, मुंबई आणि कुडाळ या ठिकाणी ३३ वर्षे सेवा केल्याने अनेक अनुभव मिळाले. उद्योजकांना न्याय देण्याचे काम केले. सर्व सहकार्‍यांचे सहकार्य मिळाले, माझ्या या श्रेयाला सर्व सहकारी कारणीभूत आहेत.’’