उस्मानाबाद शहराचे नाव पूर्ववत् ‘धाराशिव’ करावे !

हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने १० सहस्र स्वाक्षऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

संभाजीनगर, ११ जून (वार्ता.) – उस्मानाबाद शहराचे, तसेच जिल्ह्याचे प्राचीन नाव ‘धाराशिव’ असे होते. त्यामुळे ते नाव पूर्ववत् ‘धाराशिव’ करण्यात यावे, यासाठी १० सहस्र स्वाक्षऱ्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संभाजीनगर येथील ‘रामा इंटरनॅशनल’ येथे ८ जून या दिवशी ‘हिंदू राष्ट्र सेने’च्या वतीने देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, तसेच परीक्षित साळुंके, मेघराज बागल, दीपक पलंगे, विशाल चंदनवडे, नितेश राखेलकर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,

१. निजाम राजवटीमध्ये मीर उस्मानअली या निजामाच्या नावावरून ‘धाराशिव’ नाव पालटून ‘उस्मानाबाद’ असे करण्यात आले होते. मुळात निजाम हा देशद्रोही होता. भारत सरकारने निजामाशी युद्ध करून निजामाची राजवट म्हणजेच हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करून घेतले होते. निजामाने हिंदुस्थानाविरुद्ध युद्ध केले होते.

२. १७ सप्टेंबर या दिवशी निजामाच्या विळख्यातून भारताला स्वतंत्र केले. त्यामुळे हा दिवस ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ दिन म्हणून मराठवाड्यामध्ये साजरा केला जातो; मात्र त्याच निजामाच्या नावाने जिल्ह्याला असलेला कलंक पुसून टाकणे आवश्यक आहे. धाराशिव जिल्ह्यातील जनभावना पहाता ‘धाराशिव’ हेच नाव पूर्ववत् करणे आवश्यक आहे.

३. मागील अनेक वर्षांपासून संघटनेच्या वतीने या मागण्यांची निवेदने वारंवार राज्य शासनाला देण्यात आलेली आहेत. जानेवारी २०२२ मध्ये संघटनेच्या वतीने कोणतेही जनआंदोलन न घेता जिल्ह्यातील १० सहस्र नागरिकांच्या स्वाक्षरीची मोहीम राबवण्यात आली होती.

शहराचे नामांतर ‘धाराशिव’ करण्याविषयीची पूर्वसिद्धता झालेली आहे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘उस्मानाबाद’ शहराचे नामांतर ‘धाराशिव’ करण्याविषयीची पूर्वसिद्धता झालेली आहे. थोड्याच दिवसांत तुम्हाला याविषयीची गोड बातमी मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना दिले.