गोवा : मोपा विमानतळावर १ सप्टेंबरपासून विमाने उतरणार

मोपा विमानतळ, गोवा

पणजी – उत्तर गोव्यातील मोपा येथे उभारण्यात आलेल्या ‘ग्रीनफिल्ड’ आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ सप्टेंबरपासून विमाने उतरणार आहेत. १५ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत दिनांक निश्‍चित करून विमानतळाचे उद्घाटन करण्यात येईल आणि विमानतळाचा पहिला टप्पा कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मोपा विमानतळ उभारणारे आस्थापन ‘जीएम्आर् गोवा’च्या नोकरदारांसाठी नियुक्ती आणि प्रवेशपत्र यांच्या वितरणाचा कार्यक्रम पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले,

‘‘करारानुसार, ‘जीएम्आर् गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ लि.’चे मनुष्यबळ कुशल आहे. पुढील ६ मासांत विमानतळावर १ सहस्र नव्या जागांसाठी भरती करण्यात येईल. ‘जीएम्आर् गोवा’ने राष्ट्रीय कौशल्यविकास केंद्राशी निगडित २० ‘एव्हिएशन सेक्टर’ अभ्यासक्रम चालू केले आहेत. गोवा राज्य सरकार आणि ‘जीएम्आर् गोवा’ विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी कटीबद्ध आहे. राज्यातील युवकांनी खासगी क्षेत्रांतील नोकरीच्या संधीचा लाभ करून घ्यावा, अन्यथा परराज्यांतून येणारे या संधीचा लाभ उठवतील.’’