मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल ८ जून या दिवशी घोषित केला. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलीच आघाडीवर आहेत. परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, तसेच उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिली.
मुख्यमंत्री संदेश देतांना म्हणाले, ‘‘आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्त्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची सिद्धता करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! पुढील वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देश यांचे भविष्य उज्ज्वल करण्याची संधी मिळणार आहे. ‘या संधीचे आपण सोने कराल’, हा विश्वास आहे.’’