७.५.२०२२ या दिवशी नाशिक येथील मुकुंद ओझरकर (वय ५८ वर्षे) यांचे निधन झाले. ७.६.२०२२ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त नाशिक येथील श्री. अनिल पाटील (वय ७५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. प्रेमभाव
मुकुंद ओझरकरकाका त्यांच्या घरी येणारे सर्व साधक आणि जिज्ञासू यांचे हसतमुखाने आदरातिथ्य करायचे. त्यांच्या कुटुंबियांचाही त्यात सहभाग असायचा. त्यांच्या घरून कधीही कोणी विन्मुख गेले नाही. ते धर्मरथातील साधकांच्या भोजनाचीही सोय करायचे.
२. इतरांचा विचार करणे
मधुमेहामुळे त्यांची प्रकृती ठीक नसायची. ‘आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, याची ते काळजी घ्यायचे.
३. सेवेची तळमळ
अ. काकांकडे नाशिक जिल्ह्यातील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे वितरण करण्याची सेवा होती. ती सेवा परिपूर्ण करण्याची त्यांची तळमळ होती. काका तत्परतेने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची मागणी पूर्ण करायचे. त्यांच्या तळमळीमुळे साधकांना वेळेत उत्पादने मिळायची.
आ. एकदा एका लिखाणाचे संगणकीय टंकलेखन करून ते परात्पर गुरु पांडे महाराज यांना द्यावयाचे होते. ‘मी बाहेरून टंकलेखन करून घेईन’, असे मी काकांना म्हटल्यावर त्यांनी ते लिखाण वाचले आणि ते मला म्हणाले, ‘‘काका बसा. तुम्ही सांगा. मी टंकलेखन करतो.’’ त्यांना शारीरिक त्रास आणि मधुमेह असूनही त्यांनी १ घंटा बसून तत्परतेने ते लिखाण टंकलिखित करून दिले. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. परात्पर गुरु पांडे महाराज यांना ते लिखाण दिले. तेव्हा ते त्यांना पुष्कळ आवडले.
४. काका सनातनचे ग्रंथ आणि ‘सनातन प्रभात’ यांचे नियमित वाचन, मनन अन् चिंतन करत असत.
असा हसतमुख आणि बहुगुणी व्यक्तीमत्त्व असलेला आध्यात्मिक मित्र दुरावल्याचे मला दुःख झाले; पण माझ्या मनातील त्यांच्या आठवणी ताज्या आहेत.
५. अंत्यदर्शनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे
अ. काकांच्या तोंडवळ्यावर बालकभाव दिसत होता.
आ. मी तिथून निघतांना ‘त्यांनी माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले’, असे मला जाणवले.
इ. त्यांची कांती तेजःपुंज दिसत होती. त्यांच्या तोंडवळ्यावर ज्ञानाचे तेज जाणवत होते.
ई. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले काकांचा हात धरून त्यांना मोक्षाला घेऊन जात आहेत’, असे दृश्य मला दिसले.
– श्री. अनिल विष्णु पाटील (वय ७५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), नाशिक (२५.५.२०२२)