कतार, कुवैत, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या देशांसह इस्लामी देशांच्या संघटनेचा विरोध

  • नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांवर केलेले कथित अवमानकारक विधानाचे प्रकरण

  • भारताने पाक आणि इस्लामी देशांच्या संघटनेला फटकारले !

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (डावीकडे) भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा

नवी देहली – महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणारे विधान केल्यावरून भाजपने प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. तत्पूर्वी कतार, कुवैत, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरेबिया या देशांनी भारताच्या राजदूतांना बोलावून जाब विचारला. तसेच इस्लामी देशांची संघटना ‘ऑर्गेनायजेशन ऑफ इस्लामिक को-ओपरेशने’ही (ओआयसीने) या प्रकरणी भारतावर टीका केली. त्याला भारताने प्रत्युत्तर दिले आहे. दुसरीकडे सौदी अरेबियाने शर्मा यांचे निलंबन केल्याने समाधान व्यक्त केले आहे.

१. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले, ‘ओआयसी संघटनेने भारताच्या विरोधात केलेली विधाने चुकीची आणि संकुचित आहेत. भारत सरकार सर्व धर्माच्या लोकांचा सन्मान करते. काही लोकांनी आक्षेपार्ह विधाने आणि ट्वीट केली होती. ते भारत सरकारचे मत नाही. आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.’

२. पाकिस्तानच्या विधानावरही भारताने प्रत्युत्तर देतांना म्हटले, ‘अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे सातत्याने हनन करणार्‍यांची विधाने कुणावरही परिणाम करणारी ठरत नाहीत. अशा देशाला दुसर्‍या देशातील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अयोग्य गोष्टींविषयी बोलण्याचा मुळातच अधिकार नाही. पाकमध्ये हिंदु, शीख, ख्रिस्ती, अहमदी आदींवर अत्याचार होत आहेत, याचा जग साक्षीदार आहे. भारत सरकार सर्व धर्मांचा सन्मान करते. याउलट पाक कट्टरतावाद्यांचे कौतुक करते, स्मारक बनवते. पाकने भारतात द्वेष पसरवण्याऐवजी स्वतःच्या देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्याकडे लक्ष द्यावे.’

संपादकीय भूमिका

  • इस्लामी देश त्यांच्या धार्मिक श्रद्धांविषयी जागृत होऊन विरोध करतात, तर भारत इस्लामी देशांत हिंदूंवर होणार्‍या आघातांवर निष्क्रीय रहातो !
  • जगभरातील इस्लामी देश काही तरी कारण शोधून भारतावर टीका करण्याची संधी शोधत असतात. हे लक्षात घेऊन भारताने आक्रमक पावित्रा घेऊन या देशांमध्ये मानवाधिकारांचे होणार्‍या हननाविषयी सूत्र लावून धरावे तसेच आक्रमक परराष्ट्र नीती वापरून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
  • इस्लामी देश कधी चीनमध्ये उघूर मुसलमानांनवर होणार्‍या अत्याचारांविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !