आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

(भाग १८)

पू. तनुजा ठाकूर

१. स्थानदेवतेसह ग्रामदेवताही प्रसन्न रहाणे आवश्यक असणे

‘स्थानदेवतेसह ग्रामदेवताही प्रसन्न रहाणे समाजाच्या समष्टी सुखी जीवनासाठी आवश्यक असते. ग्रामदेवतेला प्रसन्न करण्यासाठी वार्षिक उत्सव साजरा केला जातो. त्यात प्रत्येक ग्रामीण व्यक्ती आपापली भूमिका निष्काम भावाने निभावून ग्रामदेवतेला प्रसन्न करते. महानगर किंवा नगरविकास यांच्या नावाखाली या मंदिरांना एकतर तोडले जाते किंवा तेथील मूळ निवासींना तेथून विस्थापित केले जाते. तेथील मूळ निवासी हे शहरी व्यवस्थेत राहून आपल्या परंपरेला विसरले आहेत. यामुळे ग्रामदेवतेची महानगरे आणि उपनगरे यांवर अवकृपा आहे.

२. उपासना पीठाच्या माध्यमातून विश्वव्यापी जनजागृती होणार असल्याचे ईश्वराने सांगणे आणि त्याची पायाभरणी प.पू. अनंतानंद साईश यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी करायचे ठरवणे

मी स्वभावतः बुद्धीवादी आहे; मात्र आजच्या विवेकशून्य बुद्धीवाद्यांप्रमाणे मुळीच नाही, उलट आपल्या शास्त्राला धरून त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न मी केला आहे. डिसेंबर २०१० पासून आम्ही उपासना पीठाचे कार्य झारखंड येथील आमच्या वडिलांच्या मूळ गावात करण्यास आरंभ केला. तत्पूर्वीच मला पुष्कळ त्रास होऊ लागला होता. मी ईश्वराला विचारले, तेव्हा समजले, ‘उपासना पीठाच्या माध्यमातून विश्वव्यापी जनजागृती होणार आहे.’ डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत आम्ही २६ डिसेंबर २०१० या दिवशी म्हणजे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु प.पू. अनंतानंद साईश यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी ईश्वराच्या आज्ञेवरून उपासना पीठाची पायाभरणी शुभमुहूर्ताच्या दिवशी करण्याचे ठरवले.

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (२६.३.२०२२)