राज्यशासनाकडून सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा !
मुंबई, ३१ मे (वार्ता.) – कोल्हापूर येथे नुकतेच जुन्या वाद्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या ठिकाणी महाराष्ट्रात काही ठिकाणी वाद्यांची निर्मिती होत असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रातील जुन्या वाद्यांचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. याविषयी विभागाला सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील जुन्या वाद्यांचे संग्रहालय करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी ३१ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी अमित देशमुख यांनी सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्कार दत्ता भगत आणि सतीश आळेकर, ‘संगीताचार्य अण्णासाहेब किलोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्कार श्रीमती लता शिलेदार आणि सुधीर ठाकूर, ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ पं. हरिप्रसाद चौरसिया, ‘तमाशासम्राज्ञी नारायणगावकर जीवनगौरव’ पुरस्कार आतांबर शिरढोणकर आणि श्रीमती संध्या माने, ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव’ पुरस्कार स्वर्गीय पं. शिवकुमार शर्मा यांसह राज्य सांस्कृतिक या पुरस्कारांची घोषणा केली.
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या अत्याधुनिकीकरणाचे काम वर्षभरात चालू करणार !
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या विकासाचा आराखडा काही वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्याच्या निविदाही काढण्यात आल्या; परंतु प्रतिसाद न मिळाल्यामुळे निविदा रहित झाल्या. याविषयी काही सूचनाही आल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे हे काम झाले नाही. हा आराखडा मोठा आहे. त्यामुळे हे काम टप्प्याटप्प्याने करावे लागेल. या वर्षात कामाला प्रारंभ करण्यात येईल, असे अमित देशमुख यांनी सांगितले.
परिचारिकांच्या मागण्या १५ जुलैपर्यंत पूर्ण करू !
आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या परिचारिकांशी ३१ मे या दिवशी चर्चा झाली. त्यांनी १२ मागण्या केल्या आहेत. त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत; मात्र काही मागण्या पूर्ण करण्यास विलंब होईल.१५ जुलैपर्यंत परिचारिकांच्या मागण्या पूर्ण करू, असे अमित देशमुख यांनी म्हटले.