नाशिक येथे धर्मसंसदेत साधू-महंत यांच्यात शास्त्रार्थ चर्चा अन् वादविवाद !

  • श्री हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद विकोपाला !

  • जगद्गुरु शंकराचार्य यांचा ‘काँग्रेसी’ असा उल्लेख केल्याने, तसेच आसनस्थळावर बसण्यावरून धर्मसंसदेत वाद !

नाशिक येथे धर्मसंसदेत साधू-महंत यांच्यात शास्त्रार्थ चर्चा अन् वादविवाद

नाशिक – नाशिक रोड येथील महर्षि पंचायतन सिद्धपीठ येथे चालू असलेल्या धर्मसंसदेत श्री हनुमानाचे जन्मस्थळ कोणते, यावरून साधू, महंत आणि संत यांच्यात शास्त्रार्थ चर्चा अन् वादविवाद झाला. दोन्ही पक्ष स्वतःच्या मतावर ठाम असून कुणीही माघार घ्यायला सिद्ध नव्हते. धर्मसंसद चालू झाल्यावर येथील एका महंतांनी जगद्गुरु शंकराचार्य यांचा ‘काँग्रेसी’ उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला. या वेळी महंत सुधीरदास महाराज यांनी स्वामी गोविंदानंद सरस्वती महाराज यांच्यावर माईक उगारला. त्यामुळे धर्मसंसदेत गोंधळ झाला. ‘जगद्गुरूंचा अवमान केल्याप्रकरणी महंत सुधीरदास यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी करण्यात आली, तसेच धर्मसंसदेतील ज्येष्ठ आणि कनिष्ठ यांच्यानुसार काही महंतांचा अवमान होत असल्याचा आरोप करण्यात आला. स्वामी गोविंदानंद सरस्वती महाराज यांनी ज्येष्ठ महंतांच्या आसनावर बसू नये, यावरून वादाला प्रारंभ झाला. वादामुळे निर्णय न झाल्याने शेवटी धर्मसंसद स्थगित करण्यात आली.

१. ‘वाल्मीकि रामायणानुसार हनुमानाचा जन्म अंजनेरी येथे नाही, तर कर्नाटकातील किष्किंधा येथे झाला आहे’, असा दावा स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी केला आहे.

२. त्यांनी नाशिक येथील धर्मपंडितांना शास्त्रोक्त धर्मसंसदेचे आव्हान दिले होते.

३. धर्मसंसदेपूर्वी महर्षि पंचायतन सिद्धपीठ येथे विविध संदर्भ आणि धार्मिक ग्रंथ आणण्यात आले होते.

४. श्री हनुमान जन्मस्थळावरून कर्नाटकचे किष्किंधा, महाराष्ट्रातील नाशिक आणि आंध्रप्रदेशचे तिरुमला तिरुपति देवस्थानम यांचे स्वतःचे दावे आहेत. गुजरात, झारखंड आणि बिहार या राज्यांतही हनुमान जन्मस्थानावर दावा करण्यात आला आहे. हा वाद मिटवण्यासाठी महंत श्री मंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी ३१ मे या दिवशी येथे धर्मसंसद बोलावली होती.

पोलीस बंदोबस्तामध्ये स्वामी गोविंदानंद सरस्वती यांना एका खोलीमध्ये बंद करण्यात आले. ‘ महंत सुधीरदास महाराज यांनी क्षमा मागितल्याविना नाशिक सोडणार नाही’, असे स्वामी गोविंदानंद सरस्वती महाराज यांनी म्हटले. महंत सुधीरदास महाराज पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मी स्वामी गोविंदानंद सरस्वती महाराज यांच्यावर माईक उगारला नाही, तर त्यांना मी ‘मोठ्याने बोला’, असे म्हणत होतो. आम्हाला शंकराचार्य यांचा आदर आहे. क्षमा मागण्याचा प्रश्नच येत नाही.