किल्ले रायगडावर साकारणार शिवशाही !

  • ५ जून या दिवशी रायगडावर ‘शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन !

  • नाशिक येथून सहभागी होणार सहस्रो शिवभक्त !

नाशिक – अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने यंदाही दुर्गराज रायगडावर ५ जून या दिवशी ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ साजरा होईल. या निमित्ताने रायगडावर शिवशाही साकारणार असून येथून सहस्रो शिवभक्त सहभागी होतील, अशी माहिती दुर्गराज समितीचे सदस्य करण गायकर यांनी २८ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यात ‘तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहिरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा’, ‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे कार्यक्रम होतील. ‘देशातील लाखो शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे’, असे आवाहन समितीने केले आहे.