कुतूबमिनार हिंदु वास्तूशास्त्रानुसार बांधलेले सूर्यस्तंभ ! – पुरातत्व तज्ञ धर्मवीर शर्मा

नवी देहली – २१ जून या दिवशी दुपारी १२ वाजता सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जातो. याच्या अभ्यासासाठीच कुतूबमिनार बांधण्यात आले. हे सूर्यस्तंभ आहे. राजा विक्रमादित्य याने शास्त्रज्ञ वराहमिहिर यांच्या मार्गदर्शनाखाली हे बांधले आहे, असे भारतीय पुरातत्व विभागाचे माजी क्षेत्रीय संचालक असणारे पुरातत्व तज्ञ धर्मवीर शर्मा यांनी म्हटले आहे.

शर्मा यांनी म्हटले की, कुतूबमिनारची सावली पडत नाही. यावर २७ लहान झरोखे आहेत. यावर संकेत चिन्हे आहेत जे ज्योतिष आणि नक्षत्रे यांच्या मोजणीसाठी बनवण्यात आले आहेत. यासाठी कुतूबमिनारच्या परिसरात २७ मंदिरे होती. ती नंतर मोगलांकडून पाडण्यात आली. कुतूबमिनारच्या खाली एका विशेष दिशेने उभे राहून २५ इंच खाली वाकल्यावर तुम्हाला ध्रुव तारा दिसतो. कुतूबमिनार हिंदु वास्तूशास्त्रानुसार बांधण्यात आले आहे. यावर अरबी भाषेतील शिलालेख मोगलांनी नंतर चिकटवले आहेत. सर सय्यद अहमद खान यांनी यांचा अभ्यास करून म्हटले होते की, हे शिलालेख चिकटवलेले लागत आहेत. मोगलांची सत्ता आल्यानंतर त्यांचा उदोउदो करण्यासाठी शिलालेख चिकटवण्यात आले आहेत.

कुतूबमिनार येथील मशिदीच्या खांबावर भगवान नरसिंहाची दुर्मिळ मूर्ती

कुतूबमिनार येथील हिंदु आणि जैन यांची मंदिरे पाडून तेथे बांधण्यात आलेल्या कुव्वत-उल्-इस्लाम मशिदीच्या खांबांवर देवतेची एक मूर्ती आढळली आहे. ही मूर्ती भगवान नरसिंह आणि भक्त प्रल्हाद यांची आहे, ही माहितीही धर्मवीर शर्मा यांनी दिली.

१. धर्मवीर शर्मा यांनी सांगितले की, ही मूर्ती ८ व्या शतकातील प्रतिहार राजांपैकी असणार्‍या राजा अनंगपाल यांच्या काळातील आहे. अशा प्रकारची मूर्ती अन्यत्र कुठेही मिळालेली नाही. त्यामुळे ही दुर्मिळ मूर्ती आहे. आतापर्यंत आपण भगवान नरसिंहाच्या मूर्ती पाहिल्या आहेत, त्यात नरसिंह हिरण्यकश्यपूला ठार करतांनाचा प्रसंग असतो; मात्र या मूर्तीमध्ये भक्त प्रल्हाद भगवान नरसिंहाचा क्रोध शांत करण्यासाठी त्याला प्रार्थना केल्यानंतर भगवान नरसिंह त्याला मांडीवर घेतो, असे यात दिसते.

२. या मूर्तीच्या संदर्भात राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे अध्यक्ष तरुण विजय यांनी सांगितले की, या मूर्तीची छायाचित्रे देशातील पुरातत्व तज्ञांना अभ्यासासाठी पाठवण्यात आली आहेत.