वायूची उंची आणि सीमा २०० मीटर वाढल्याने भविष्यासाठी गंभीर चेतावणी !
नागपूर – आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञांनी प्रकाशित केलेल्या एका संशोधनामुळे अतिशय धोक्याची गोष्ट समोर आली आहे. हरित वायूमुळे पृथ्वीच्या ‘ट्रोपोस्फीयर’ आवरणाच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्याची उंची आणि सीमा गेल्या ४० वर्षांत २०० मीटरने वाढली आहे. त्यामुळे भविष्यात अनेक समस्या निर्माण होणार आहेत, असे संशोधनात स्पष्ट झाले आहे. या वाढीमुळे हवामानात प्रचंड पालट होऊन उष्ण लहरींत वाढ, अतीपाऊस, हवेचा दाब, आर्द्रता आणि वार्याची दिशा यांवर विपरीत परिणाम होत आहे, अशीही माहिती या संशोधनात दिली आहे.
१. पृथ्वीचे वातावरण १०० किमी आणि त्याहीपेक्षा उंचीपर्यंत असते; परंतु त्यातील सर्वांत खाली आणि हवामानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ‘ट्रोपोस्फीयर’ या ध्रुवावर १०, तर विषुववृत्तावर २० किमी उंचीचे आवरण असते.
२. याच आवरणात ढगांची निर्मिती, वार्याची गती, हवेचा दाब, आर्द्रता, तापमान, विजा आणि पाऊस, अशा हवामानाच्या सर्व घडामोडी घडत असतात. त्यामुळे त्यात पालट होणे, ही धोक्याची चेतावणी आहे.
३. मनुष्याला जिवंत ठेवणारा प्राणवायू याच थरात आहे. ५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या विज्ञान मासिकात हे नवे संशोधन प्रकाशित केले आहे.
४. अभ्यास आणि निरीक्षणात आढळले की, वर्ष १९६० पूर्वी हे आवरण स्थिर होते; परंतु पृथ्वीवर मानव-निर्मित ‘ग्रीन हाऊस गॅसेस’ची निर्मिती होत असल्याने हे वायू या थरात गोळा झाल्याने पृथ्वीचे आवरण उष्ण होते. सूर्याची उष्णता पृथ्वीवर येते; परंतु प्रदूषित वायूमुळे ही उष्णता वरील वातावरणात परत जात नाही. याला ‘ग्रीन हाऊस इफेक्ट’ म्हणतात.
५. वर्ष २००० पासून या आवरणाचे तापमान ८० टक्क्यांनी वाढले आहे. मानव-निर्मित कारणांमुळे हे अतिशय संवेदनशील आवरण २०० मीटर उंचावणे ही धोक्याची घंटा आहे, असेही संशोधनात म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाविज्ञानाचे दुष्परिणाम जाणा ! सहस्रो वर्षांपासून प्रदूषणमुक्त असलेली पृथ्वी विज्ञानाने अवघ्या १०० वर्षांत इतकी प्रदूषित करून टाकली, की त्याचा मानवावर जीवघेणा परिणाम होत आहे. हे सत्य विज्ञानवादी कधीही मान्य करणार नाहीत ! |